औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी महापालिकेकडे अंतिम प्रभाग आराखडा सुपूर्द केला. त्यानंतर प्रशासनाने लगेच आराखडा प्रसिद्ध केला. हा आराखडा पाहून प्रमुख राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकही या आराखड्यावर खूश नाहीत. काही मोजक्याच राजकीय मंडळींना अभय देण्यात आले आहे, अशी चर्चा रंगली आहे.
मागील आठवड्यात व्हायरल झालेला आराखडा आणि गुरुवारी प्रसिद्ध झालेला आराखडा यामध्ये थोडाफार बदल करण्यात आला आहे. आयोगाकडून प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम आराखड्यात शिवसेनेला मोठा दिलासा मिळेल, असे मानले जात होते. मात्र, ते यात दिसत नाही. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गुलमंडी वाॅर्डाचे तुकडे करण्यात आलेत. मागील २० वर्षांपासून महापालिकेत अधिराज्य गाजविणाऱ्या शिवसेनेतील दिग्गज नगरसेवकांना या प्रभाग रचनेत धक्का बसला आहे. शिवसेनेच्या बहुतांश प्रभागांना जेथून मतदानच मिळत नाही, अशा वसाहती जोडण्यात आल्या आहेत.
विरोधी बाकावर असलेल्या भाजपची अवस्था खूप चांगली नाही. ज्या वॉर्डातून भाजपचे नगरसेवक डोळे बंद करून निवडून यायचे, त्यांना आता मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. भौगोलिकदृष्ट्या काही प्रभाग अत्यंत मोठे, तर काही प्रभाग अत्यंत छोटे करण्यात आले. भाजपच्या मिशन ६० या मोहिमेला खीळ बसली आहे. एका प्रभागात भाजपचे तीन उमेदवार सहजासहजी निवडून येणार नाहीत, याची काळजी घेण्यात आली आहे.२०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एमआयएम या नव्या पक्षाने महापालिकेत तब्बल २४ नगरसेवक निवडून आले होते. नवीन प्रभाग रचनेत मुस्लिमबहुल भागातील प्रभागात एमआयएम दृष्टीने सोयीचे राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, प्रसिद्ध आराखडा पाहून एमआयएमच्या माजी नगरसेवकांनाही मोठा धक्का बसला. अनेक प्रभागांना हिंदू बहुल भाग जोडण्यात आले आहेत.
काय म्हणतात राजकीय पक्षांचे नेते:
निकषांचे उल्लंघनशिवसेनेच्या दृष्टीने प्रभाग आराखडा अजिबात सोयीचा नाही. मोजकेच एक किंवा दोन प्रभाग सोडले, तर सर्वच ठिकाणी आलबेल कारभार दिसून येतो. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषांचे उल्लंघन होताना दिसून येते. सूचना आणि हरकतीद्वारे आम्ही आक्षेप घेणार आहोत.- नंदकुमार घोडेले, माजी महापौर
आक्षेप दाखल करणारप्रभाग आराखड्याचा बारकाईने अभ्यास केला असता अनेक प्रभागांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते. नको असलेल्या वसाहती जोडण्यात आल्या आहेत. या वसाहती जोडताना कोणत्या निकषांचे पालन केले, हे कळायला मार्ग नाही. आम्ही मोठ्या प्रमाणात आक्षेप दाखल करणार आहोत. गरज पडली तर न्यायालयात सुद्धा जाण्याची तयारी केली जाईल.- बापू घडामोडे, माजी महापौर
ताळमेळ बसत नाहीप्रभाग रचनेचा आराखडा तयार करताना कोणत्या नियमांचे पालन केले, हे कळत नाही. तीन विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या आणि महापालिका हद्दीतील लोकसंख्या याचा ताळमेळ बसत नाही. प्रभाग तयार करताना मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा घोळ घालण्यात आला आहे. आम्ही याचा कडाडून विरोध करणार आहोत.- नासेर सिद्दिकी, माजी गटनेता एमआयएम.