औरंगाबाद - परतीच्या पावसाने बळीराजावर दु:खाचा डोंगर कोसळला असून ऐन दिवाळीत मोठं नुकसान झालं आहे. शासनाने मदतीची घोषणा केली, पण ती केवळ डोळे पुसण्यासारखंच ठरणार आहे. प्रत्यक्षात झालेलं नुकसान हे न भरुन येणारं आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या पवासाचा मोठा फटका बसल्याने दिवाळीचा सण गोड लागेना. दोन दिवसांपूर्वी औरंगाबादच्या एका शेतकरीपुत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पैसे नसल्याने दिवाळीला कपडे घेतले नाही, असं तो चिमुकला सांगतो. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या कुटुंबीयांस सोशल मीडियातून मदतही मिळाली. आता, थेट कृषीमंत्री त्या मुलाच्या बांधावर पोहोचले आहेत. शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. तसेच ते त्या चिमुकल्या शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन त्याला आधार देणार असल्याचे समजेत. यासंदर्भात माहिती मिळताच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी रात्रीच मतदारसंघातील पीडित शेतकरी कुटुंबीयांच्या बांधावर धाव घेतली. यावेळी, त्यांच्याशी संवाद साधत कुटुंबीयांना 50 हजार रुपयांची मदतही देऊ केली.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे रात्री 12 वाजता गंगापूर तालुक्यातील बुट्टेवडगाव आणि सिध्दनाथ वाडगाव येथे पोहोचले. येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मुलगा ऋषीकेश ज्ञानेश्वर चव्हाण याच्या घरी जाऊन त्या मुलाची आणि त्यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली. त्यांना दिवाळीसणासाठी फटाके, कपडे आणि इतर साहित्य मिठाई तसेच 50 हजार रुपये रोख अशी मदत दिली आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज गंगापूरच्या दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वीच कृषिमंत्र्यांनी धाव घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
उद्धव ठाकरेंचा आज औरंगाबाद दौरा
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आजपासून औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानाचा आढावा घेऊन त्यांना शासकीय मदत तातडीने मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मराठवाड्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच, औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील चिमुकल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्या शेतकरी कुटुंबीयांसही उद्धव ठाकरे भेट घेऊन मदत करणार असल्याचे समजते.