छत्रपती संभाजीनगर : दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांमुळे शहर व परिसरातील हवा दूषित झाली असून सहा दिवसांपासून हवेतील प्रदूषण वाढलेले आहे. गुरुवारी (दि. १६) दिवसभर प्रदूषित हवा होती. १०१ ते २०० या दरम्यान हवेच्या प्रदूषणाचा दर होता. यलो झोनमध्ये शहर होते. त्यामुळे श्वसनासह अस्थमा, हृदयाचे आजार असणाऱ्यांसाठी हवा धोकादायक होती. श्वसनाशी निगडित आजार असणाऱ्यांवर मास्क लावण्याची वेळ आली आहे. फटाक्यांच्या आतषबाजीचा हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे.
१० नोव्हेंबरपासूनच हवेत बदल होत गेला. ११ नोव्हेंबरपासून शहर व औद्यागिक वसाहतींमधील हवेचे प्रदूषण वाढले. ११ रोजी हवेतील कार्बन वाढल्याने शहर व परिसरात हवा प्रदूषित होती. १२ नोव्हेंबर रोजी पहाटे हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण जास्त नव्हते. सायंकाळी सात वाजल्यानंतर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शहर रेड झोनमध्ये आले. वाळूज, चिकलठाणा परिसरातदेखील अशीच अवस्था होती. पहाटे चार वाजेपर्यंत हवा प्रदूषित होती. पहाटे चार वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत हवा सामान्य होती; परंतु, त्यानंतर पुन्हा हवेची गुणवत्ता ढासळली. १३ नोव्हेंबर रोजी हवेच्या गुणवत्तेचा दर स्थिर होता. मंगळवार व बुधवारी अनुक्रमे दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज हे सण होते. त्या दिवशीही फटाक्यांची आतषबाजी मोठ्या प्रमाणात झाली. त्याचाही परिणाम हवेच्या शुद्धतेवर झाला.
१२, १४ व १५ रोजी वाढला प्रदूषणाचा दर.....१२, १४ व १५ नोव्हेंबर रोजी वाढला प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले होते. १४ रोजी दिवाळीचा पाडवा होता. या दिवशी चिकलठाणा व वाळूज परिसर रेडझोनमध्ये होता. या भागातील हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली होती. हवेत धूलिकण जास्त प्रमाणात होते. शहरातील हवादेखील प्रदूषित होती. भारताने न्यूझीलंडवर विजय मिळविल्यानंतर शहर व परिसरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आल्यामुळे १५ नाेव्हेंबर रोजीही हवा प्रदूषितच होती.