औरंगाबाद: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून लवकरच वेरुळ येथील १२ वे ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या घृष्णेश्वर मंदिराच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्याऔरंगाबाद मंडळाचे पश्चिम क्षेत्र उपाधिक्षक (रसायन शाखा) श्रीकांत मिश्रा यांनी दिली.
पावसाळा संपल्यानंतर हे काम हाती घेण्यात येणार आहे. मंदिराचा बाह्य भाग लाल बेसाल्ट खडकाचा वापर करून बांधलेला आहे, तर मंदिराच्या शिखरावर चुन्याचा लेप आहे. पावसाळ्याच्या हंगामानंतर काम सुरू होईल आणि दोन महिन्यांच्या कालावधीत ते पूर्ण केले जाणार आहे. मंदिराचा वरचा भाग थोडा काळवंडला आहे. जागोजागी भेगाही पडलेल्या आहेत. त्यादृष्टी काम केले जाणार आहे. मंदिरावरील शिल्पांच्या संवर्धानाचेही काम केले जाणार आहे.
घृष्णेश्वर मंदिर आणि शिवालय तीर्थकुंड या वास्तूंचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला. दोनशे वर्षांपूर्वी अहल्याबाई होळकर यांनी ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख शिलालेखात सापडतो. त्यापूर्वी मालोजीराजे भोसले यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख भांडारगृहावरील शिलालेखात आहे. मंदिराचा अर्धा भाग लाल पाषाणात तर वरील भाग विटा व चुन्यात बांधलेला आहे.