छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी शहरातील किराडपुरा भागात पोलिसांवर हल्ला झाला, वातावरणात अजूनही धगधग आहे. त्यामुळे जयंती साजरी करा, पण सावध राहून, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहर पोलिसांतर्फे तापडिया नाट्यमंदिरमध्ये सोमवारी सायंकाळी शांतता समितीची बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, आ. संजय शिरसाठ, आ. प्रदीप जैस्वाल, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजू शिंदे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, बाबूराव कदम, मिलिंद दाभाडे, पृथ्वीराज पवार, पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे, शिलवंत नांदेडकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी व्यसपीठावर उपस्थित होते.
पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता म्हणाले, पोलिसांची परवानगी घेऊनच मिरवणूक काढा. परवानगी घेतल्यामुळे सुरक्षा तैनात करता येते. धार्मिकस्थळांच्या समोर घोषणाबाजी करू नका. पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यामुळे अजानच्या वेळी मागच्या वर्षीप्रमाणे म्युझिक बंद करा. सोशल मीडियात कोणी चुकीची पोस्ट टाकत असेल, तर पोलिसांना कळवा. यावेळी मनपा आयुक्त चौधरी म्हणाले, पदाधिकाऱ्यांच्या सूचनांची दखल घेतली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रोषणाई, मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्यात येतील. त्याशिवाय रस्त्यांवरील पॅचवर्क, विद्युत दुरुस्ती, अतिक्रमणही काढण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय म्हणाले, सोशल मीडियामध्ये वादग्रस्त पोस्ट टाकून समाजात तेढ निर्माण होईल, असे कृत्य कोणीही करू नये. सूत्रसंचालन सहायक पोलिस आयुक्त बालाजी सोनटक्के यांनी केले. बैठकीत मोठ्या संख्येने समितीचे पदाधिकारी, उत्सव समित्यांचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणी, लाईट, रस्त्यांची मागणीबैठकीतील उपस्थित कार्यकर्त्यांनी पोलिसांची परवानगी विनाविलंब द्यावी, मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, बससेवा उपलब्ध करून द्यावी, मोबाईल टॉयलेट उभारावेत, पथदिव्यांची दुरुस्ती करावी आदी विविध सूचना केल्या. त्या सूचनांची पूर्तता करण्याचे आश्वासन प्रशासनाच्यावतीने देण्यात आले.
अजानच्या वेळी म्युझिक बंद करापवित्र रमजान महिना सुरू आहे. मागील वर्षी अजानच्या वेळी अचूकपणे मिरवणुकीत सुरू असलेले म्युझिक बंद करीत सामाजिक एकतेचा मोठा संदेश देण्यात आला होता. यावर्षीसुद्धा त्याचे अनुकरण केले पाहिजे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी करताच उपस्थितांतून जोरदार प्रतिसाद देण्यात आला. त्याशिवाय धार्मिकस्थळांच्या समोरून जाताना विनाकारण घोषणाबाजी करू नये, त्यातून युवकांची माथी भडकवण्याचे काम करण्यात येते. प्रत्येक धार्मिकस्थळांचा प्रत्येकाने सन्मान केला पाहिजे. साेशल मीडियात वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे दोघांवर गुन्हे नोंदवले आहेत. आता संबंधित ग्रुपच्या ॲडमिनवरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाची वाद्य वाजविण्यास १० वाजेपर्यंतच परवानगी आहे. मात्र, १५ दिवस २ दोन तास वाढवून मिळतात. आंबेडकर जयंतीलाही दोन तास वाढवून मिळालेले आहेत. त्यामुळे मध्यरात्री १२ वाजता म्युझिक बंद होईल, असे त्यांनी सांगितले.