छत्रपती संभाजीनगर : मकर संक्रांती सणाला सौभाग्याचे लेणे असलेल्या बांगड्या सर्वाधिक विक्री होतात. अवघ्या काही दिवसांवर हा वर्षातील पहिला सण आला आहे. यासाठी उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून मागील महिन्याभरात १२ ट्रक भरून बांगड्या बाजारात विक्रीसाठी आल्या आहेत. या बांगड्यांची विक्री जिल्ह्यातच नव्हे, तर नांदेडपर्यंत होणार आहे.
१२ लाख डझन बांगड्या विक्रीलाफिरोजाबाद येथून काचेच्या बांगड्यांचे १२ ट्रक शहरात दाखल झालेत. प्रत्येक ट्रकमध्ये १ लाख डझन बांगड्यांचा समावेश असतो. अशा १२ लाख डझन बांगड्या खास मकर संक्रांती सणानिमित्त विक्रीसाठी आल्या आहेत.
ग्रामीण भागात काचेच्या बांगड्यांना जास्त मागणीछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच ५ लाख डझन बांगड्या विक्री होतात. त्यातील ग्रामीण भागात ३ लाख डझन, तर शहरात २ लाख डझन बांगड्या विकल्या जातात. शहरात अनेक महिला नोकरी करतात. एका हातात घड्याळ, तर दुसऱ्या हातात मेटलचे कडे घालण्याचा ट्रेंड शहरात सुरू आहे. यामुळे दरवर्षी शहरात ५ ते ७ टक्क्यांनी बांगड्यांची विक्री कमी होत आहे. मात्र, असे असेल, तरी नोकरदार महिला सणासुदीच्या दिवसात, लग्नसराईत आवर्जून काचेच्या बांगड्या घालतात.- उर्वेश जैन, बांगड्यांचे व्यापारी
लाडकी बहीण बांगडीचे आकर्षणदरवर्षी नवीन डिझाइनच्या बांगड्या मकर संक्रांतीला येत असतात. मागील वर्षभरात ‘लाडकी बहीण’ हा शब्द खूप लोकप्रिय झाला. याचेच मार्केटिंग करीत उत्तर प्रदेशातील बांगड्या निर्मात्यांनी ‘लाडकी बहीण’ नावाची काचेची बांगडी विक्रीला आणली, तसेच ‘अजूबा, हलचल’ नावाच्या बांगड्यांचे नवीन डिझाइन बघण्यास मिळत आहे. यातही चायना पॉलिशवाल्या बांगड्यांची विक्री जास्त असते.