छत्रपती संभाजीनगर : टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा १० नोव्हेंबर २००० या दिवशी शहरात आले होते. त्यांच्या उपस्थितीत डॉ. हेडगेवार रुग्णालयाचे उद्घाटन झाले होते. हा शानदार सोहळा अजूनही शहरवासीयांच्या स्मरणात आहे.
उद्घाटनप्रसंगी टाटा म्हणाले होते की, शासनाच्या मदतीशिवाय लोकांच्या सहभागातून हेडगेवार रुग्णालयासारख्या संस्था उभ्या राहतात. अशाच संस्था जागोजागी उभ्या राहिल्या पाहिजे. वैद्यकीय व्यवसायात ज्याप्रमाणे एकत्र येऊन काम केले जाते, तसेच अन्य क्षेत्रातही काम झाले तर देश उभारणीसाठी मदत होईल. जागतिकीकरणामुळे आज आपण जवळ येत आहोत. जग हे एक खेडे बनत चालले आहे. अशा वेळी रुग्णांच्या सेवेत इमारत उभारण्यात येते, यासाठी सरकारची मदत घेतली जात नाही. समाजातील श्रीमंतांनी आपण समाजाचे काही देणे लागतो, असे समजून पुढे आले पाहिजे. त्या सोहळ्यात तत्कालीन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री राजेंद्र दर्डा तसेच प्रांत संघचालक डॉ. अशोक कुकडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. या सोहळ्यात भाषणात बरेच हास्यविनोदही झाले होते. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्राॅफ, माजी खा. मोरेश्वर सावे, आ. हरिभाऊ बागडे, शरद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
खरात गुरुजींसाठी केली होती प्रार्थनाडॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यात बौद्ध महासंघ सभाचे कार्यकर्ते जी.आर. खरात यांना अचानक चक्कर आली होती. लगेच त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. रतन टाटा यांनी आपल्या भाषणात त्यांचा उल्लेख केला. खरात गुरुजींना लवकर आराम मिळो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली होती.
अन् रतन टाटा उद्गारले, ‘खुद की बॅग खुदने संभालनी चाहिए’छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या उद्घाटनाला प्रसिद्ध उद्योगपती रतर टाटा आले होते. मुंबईहून हेलिकॉप्टरने ते निघाले. त्यांच्यासमवेत नितीन गडकरी व छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक विवेक देशपांडे होते. हेलिकॉप्टरमध्ये रतन टाटा यांच्या हातात एक छोटी बॅग होती. देशपांडे त्यांना म्हणाले, ती बॅग माझ्याकडे द्या, मी सांभाळतो. त्यावर रतन टाटा उद्गारले, ‘खुद की बॅग खुदने संभालनी चाहिए’. यातून मी खूप काही शिकलो. मोठा- छोटा हा भेद त्यांनी केला नाही. ते सर्वांना बरोबरीची वागणूक देत होते. उद्योगपती असण्याचा कुठलाही आव त्यांच्याकडे नव्हता, अशी प्रतिक्रिया देशपांडे यांनी व्यक्त केली.