छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सर्वसाधारण उमेदवाराला २५ तर राखीव मतदारसंघासाठी १२ हजार ५०० हजार रुपये अनामत रक्कम लागणार आहे. अपक्ष उमेदवारांना १० सूचक मतदारसंघातीलच रहिवासी असणे गरजेचे आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत उमेदवारांसाठी महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. औरंगाबाद मतदारसंघात १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवार, सूचकाने सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी अथवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करावा लागेल. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या दालनात अर्ज देता येईल.
एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. एक उमेदवार जास्तीत जास्त दोन मतदारसंघांत अर्ज दाखल करू शकेल. अर्ज भरताना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयापासून १०० मीटरच्या आत जास्तीत जास्त तीन वाहने उमेदवाराला आणता येतील. अर्ज दाखल करतेवेळी केवळ ५ जण उपस्थित राहू शकतील. उमेदवारी अर्जासोबत उमेदवारांना २ बाय २.५ सेमी आकाराचा देण्यात यावा. ऑनलाइन डेटा एन्ट्रीची सुविधा देखील उपलब्ध आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी ‘सुविधा’ या पोर्टलवर व्यवस्था आहे. त्यावर माहिती आणि शपथपत्र अपलोड करता येईल. अपूर्ण शपथपत्र असेल तर अर्ज रद्द होणे शक्य आहे. राजकीय पक्षांना अर्ज ‘अ’ आणि ‘ब’ भरणे व स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.