औरंगाबाद : क्षणिक मूल्यांकनात दर्जा घसरलेल्या, भौतिक सुविधांचा अभाव असलेल्या १० पैकी आठ महाविद्यालयांच्या सुविधा पडताळणीचे पोस्टमार्टेम कुलगुरूंनी नेमलेल्या चार अधिष्ठातांच्या समित्यांनी पूर्ण केले. तर उर्वरित २ महाविद्यालयांची तपासणी सत्यशोधनाचा वस्तुनिष्ठ अहवाल प्रकुलगुरूंची समिती पुढील २-३ दिवसांत सादर करणार आहे. त्यानंतर १५ तर टप्प्याटप्प्याने या शैक्षणिक वर्षात ७० महाविद्यालयांच्या तपासणीचे नियोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.
कोहिनूर महाविद्यालयाची अवस्था कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी बघितल्यानंतर इतर महाविद्यालयांची देखील तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोहिनूरवर झालेल्या दंडात्मक व प्रवेश रोखल्याने शिक्षणाचा धंदा मांडलेल्या महाविद्यालयांनी धसका घेतला आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतून नो ग्रेड, ग्रेड घसरलेले, पदव्युत्तर प्रवेशाची जास्त संख्या असलेले, विज्ञान शाखेचे अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयांची यादी तयार केली आहे. त्यातील पहिल्या दहा महाविद्यालयांची तपासणीची प्रक्रिया सुरू झाली. अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. वाल्मीक सरोदे, डॉ. प्रशांत अमृतकर, डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखालील समित्यांनी व्हिडीओ रेकाॅर्डिंगसह पडताळणी पूर्ण करून अहवाल सादर केले. प्र. कुलगुरू डाॅ. श्याम शिरसाट यांच्या अध्यक्षतेखालील समिती पुढील २-३ दिवसांत दोन महाविद्यालयांची पडताळणी पूर्ण करेल. या महाविद्यालयांवर काय कारवाई होते. याकडे संस्थाचालकांचे लक्ष लागले आहेत.
शैक्षणिक मूल्यांकन न करणारे रडारवरमार्चपूर्वी झालेल्या २३५ महाविद्यालयांच्या शैक्षणिक मूल्यांकनात आढळून आलेल्या ४५ महाविद्यालयांनाही सुधारण्याची संधी देऊन पुन्हा मूल्यांकन होईल. शैक्षणिक मूल्यांकनाला आलेच नाही. प्रक्रियेत आहेत. मात्र, प्रतिसाद देत नाही, अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल, असे प्र-कुलगुरू म्हणाले.
निकषांनुसार पडताळणीचे व्हिडीओ रेकाॅर्डिंगपायाभूत, भौतिक, शैक्षणिक सुविधांच्या पडताळणीत संस्थात्मक भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा, विद्यार्थी विकास व कल्याण, कर्मचारी विकास व संशोधन, आर्थिक निकष, संलग्नीकरणाचा अर्जातील निकषांची पडताळणी व्हिडीओ रेकाॅर्डिंगद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे महाविद्यालयांना त्यांचे म्हणणे मांडताना पडताळणीवर आक्षेप घेता येणार नसल्याची खबरदारी विद्यापीठ घेत आहे.
यावर्षी ७० महाविद्यालयांची यादीदहानंतर आता पुढच्या टप्प्यात १५ महाविद्यालयांची पडताळणी होईल. त्यानंतर आणखी महाविद्यालयांची पडताळणी केली जाणार आहे. ही नियमित प्रक्रिया असेल. यावर्षी किमान ७० महाविद्यालयांची पडताळणी करण्याचा मानस आहे.-डाॅ. श्याम शिरसाट, प्र-कुलगुरू