छत्रपती संभाजीनगर : बायजीपुऱ्यात तासाभरात बाॅम्ब फुटणार असल्याचा ’फेक कॉल’ आल्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. बायजीपुऱ्यातील प्रत्येक गल्ली पोलिसांनी धुंडाळली. तब्बल दोन तास शोधल्यावर ‘फेक कॉल’ असल्याचे उघड झाले. फळविक्रेत्याच्या १२ वर्षाच्या मुलाने मित्रासोबत हा प्रकार केला होता. रविवारी दुपारी हा प्रकार घडला. या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
असद खान अजगर खान (इंदिरानगर, बायजीपुरा) असे फळविक्रेत्याचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिन्सी ठाण्यातील अंमलदार रामेश्वर सावळे आणि शेख नाजेर हे कर्तव्यावर होते. त्यांना दुपारी अडीच वाजता ‘बायजीपुरा येथे तासाभरात बाॅम्ब फुटणार’ असा फोन आला. पोलिसांची धावपळ उडाली. त्यांनी तत्काळ जिन्सी ठाण्यातील ड्युटी अधिकारी उपनिरीक्षक गणेश माने यांना माहिती दिली. माने यांनी ठाणेदार आम्रपाली तायडे यांना कळवले. जिन्सी पोलिसांची पथके बायजीपुरा भागात दाखल झाली. बीडीडीएसचे पोलिस निरीक्षक भगवान वडतकर हेदेखील संपूर्ण पथकासह बायजीपुऱ्यात आले.
दहशतवादविरोधी पथक आले. दरम्यान, सायबर पोलिसांनी ज्या नंबरवरून कॉल आला होता, त्याचे लोकेशन दिल्यामुळे पोलिस संबंधित ठिकाणी पोहोचले. तो नंबर असद खानच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाल्यावर असदला शोधले. त्याला याबाबत विचारल्यावर अडीच वाजता मोबाइल मुलाकडे होता. त्यांचा १२ वर्षांचा मुलगा आणि त्याच्या मित्राने हे कॉल्स केल्याचे उघड झाले. त्यांनी अनेक कॉल्स केले होते. त्यातील हा एक कॉल असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी असद खानला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.