छत्रपती संभाजीनगर : राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा, यादृष्टीने राज्य शासनाने साधारणपणे चार वर्षांपूर्वी ‘पुस्तकाचे गाव’ ही योजना जाहीर केली होती. या योजनेसाठी आपल्या जिल्ह्यातील वेरुळ हे गाव निश्चित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर ही योजना वेरूळ येथे प्रत्यक्षात आजपर्यंत अंमलात आलीच नाही, हे पुस्तकप्रेमी आणि अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट झाले आहे.
राज्य शासनाने सन २०१९-२० मध्ये पुस्तकांचे गाव या योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वेरूळसह गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले आणि सांगली जिल्ह्यातील अंकलखोप (औदुंबर) या चार जिल्ह्यांत पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार करण्यास मान्यता दिली. या योजनेंतर्गत गावामध्ये विविध साहित्य प्रकारांची विभागणी करून १० दालने तयार करणे, या दालनांमध्ये वाचकांना सर्व प्रकारची दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून देणे, त्यातील एका दालनात मराठी भाषा विभागाची विविध प्रकाशने उपलब्ध करण्याचे जाहीर केले होते. एवढेच नव्हे, तर येथे पर्यटक सुद्धा आकर्षित व्हावेत यासाठी गावामध्ये भिंती रंगवून वातावरण निर्मिती करण्यात यावी, अशी सूचनाही मंत्री केसरकर यांनी राज्य मराठी विकास संस्थेस देऊन या दालनांसाठी प्रत्येकी एक हजार दर्जेदार पुस्तकांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते.
पुस्तकाचं गाव; चार वर्षांपूर्वी घोषणाशासनाने साधारणपणे चार वर्षांपूर्वी राज्यात वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा, या हेतूने पुस्तकाचं गाव योजना राबविण्याची घोषणा केली होती.
वेरूळ गावची केली होती निवडपुस्तकाचं गाव ही योजना राबविण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील वेरूळ गावाची निवड करण्यात आली होती.
‘पुस्तकाचं गाव’मधून काय साध्य होणार? या योजनेच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा तसेच पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.
दर्जेदार पुस्तकं वाचायला मिळणारपुस्तकाचं गाव या योजनेची अंमलबजावणी झाली असती, तर पुस्तकप्रेमींना सर्व प्रकारची १ हजार दर्जेदार पुस्तके वाचनासाठी उपलब्ध झाली असती.
‘पुस्तकाचं गाव’ योजनेची पानं मिटली? या योजनेची घोषणा झाली. पण, पुढे यासंदर्भात शासनाकडून कसल्याच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हर्षोल्हासित झालेल्या वाचकांचा भ्रमनिराश झाला.