छत्रपती संभाजीनगर : ‘पुस्तकाचे आत्मवृत्त’, ‘पुस्तकाचे मनोगत’, ‘पुस्तकाची आत्मकथा’... आता हे विषय निबंधापुरते मर्यादित राहिले नाहीत... किंवा ‘पुस्तक बोलू लागले तर..’ हीसुद्धा ‘परिकल्पना’ राहिली नाही. अहो, प्रत्यक्षात पुस्तके बोलू लागली आहेत. पुस्तकांनाही ‘कंठ’ फुटला आहे. हा काही चमत्कार नव्हेतर, आधुनिक तंत्रज्ञानाची किमया आहे.
होय, बाजारात दिल्लीतील खाजगी प्रकाशकांनी प्रसिद्ध केलेली शालेय पुस्तके विक्रीसाठी आली आहेत. सध्या शिशू वर्ग तसेच बालवाडी, इयत्ता पहिलीचे पुस्तक चिमुकल्यांशी बोलू लागले आहे. अ, आ, इ, ई असो वा ए, बी, सी, डी असो की बडबडगीत असो; बालकांना पुस्तकातून ऐकण्यास मिळत आहे. या पुस्तकांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन भविष्यात महाराष्ट्रातील खाजगी प्रकाशकही ‘बोलणारी डिजिटल पुस्तके’ प्रकाशित करतील.
बोलण्याचा पहिला मान पुराण ग्रंथांनामर्यादा पुरुषोत्तम ‘श्रीरामाची कथा’ रामायण व भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर जो उपदेश दिला ती ‘श्रीमद् भगवतगीता’ हे दोन आध्यात्मिक महान ग्रंथ आहेत. आध्यात्मिकतेला तंत्रज्ञानाची जोड देऊन देशातील पहिल्या डिजिटल होणाऱ्या ग्रंथांचा मान या दोन ग्रंथांना मिळाला. हे दोन्ही ग्रंथ ‘विस्डम’ फ्लूट डिव्हाइसच्या साह्याने बोलत आहेत.
पुस्तक कसे बोलते?१) डिजिटल पुस्तकाच्या छपाईसाठी ‘मॅग्नॅटिक इंक’चा वापर करण्यात आला आहे.२) पुस्तकाच्या प्रत्येक पानाला ‘सेंसर’ आहे.३) पुस्तकासोबत ‘बुक रीडर डिव्हाइस’ देण्यात आले आहे.४) पेनासारखे असलेल्या या ‘डिव्हाइस’ला स्पीकर लावण्यात आला आहे.५) पुस्तकाच्या पानावर ज्या अक्षरावर तो ‘पेन’ (डिव्हाइस) ठेवला की तेव्हा ते अक्षर, तो शब्द, कविता स्पीकरमधून ऐकण्यास मिळते. अशा प्रकारे पुस्तक विद्यार्थ्यांशी बोलू लागते.६) या ‘डिव्हाइस’मध्ये आवाज कमी-जास्त करणे, रेकॉर्डिंगची सुविधा आहे.७) या डिव्हाइसला रिचार्जेबल बॅटरी आहे.