छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-७ येथील बॉटनिकल गार्डन ओसाड पडले होते. मॉर्निंग वॉकशिवाय या ठिकाणी कोणीही फिरकत नव्हते. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी उद्यानात बोटिंग, मिनी ट्रेन आणि बच्चे कंपनीसाठी अनेक खेळणे बसविले. त्यामुळे उद्यानात सायंकाळी पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहत नाही. रविवारी उद्यान पूर्णपणे हाऊसफुल्ल असते. तिकिटाच्या माध्यमातून मनपाला दररोज २० ते २५ हजारांचे उत्पन्न मिळू लागले. महिना किमान साडेसात लाख रुपये जमा होतात. लवकरच उद्यानात खाऊ गल्ली विकसित केली जाणार आहे.
शहरात सिद्धार्थ उद्यानाशिवाय बच्चे कंपनीला दुसरा पर्याय नव्हता. सिडको-हडको, किराडपुरा, रोशनगेट, कटकटगेट आदी भागात राहणाऱ्या नागरिकांना जवळपास चांगले उद्यान नव्हते. मौलाना आझाद चौक आणि बजरंग चौकाच्या मध्यभागी सिडकोकडून मोठे उद्यान मनपाकडे हस्तांतरित झाले होते. मात्र, मनपाने मागील काही वर्षांत या उद्यानाकडे अधिक लक्ष दिले नाही. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी उद्यानाची पाहणी केली. उद्यानात नैसर्गिक एक छोटेसे पाण्याचे तळे पाहिले. या ठिकाणी बोटिंग सुरू करण्याचे आदेश दिले. माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या निधीतून तयार करण्यात आलेली व कालांतराने बंद पडलेली मिनी ट्रेनही सुरू करण्याची सूचना केली. उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी अल्पावधीत उद्यानाचा चेहरामोहरा बदलून टाकला. उद्यानात बच्चे कंपनीसाठी अनेक खेळणे बसविण्यात आले. सुंदर हिरवीगार लॉन लावली. अलीकडेच या उद्यानाचे लोकार्पणही करण्यात आले. मनपाने प्रवेश फीसुद्धा सुरू केली. मोठ्या व्यक्तींना १० रुपये, लहान मुलांना पाच रुपये प्रवेश फी आहे. बोटिंग, रेल्वे खासगी एजन्सीला चालविण्यासाठी दिली. त्यातूनही मनपाला रॉयल्टी मिळत आहे.
खाऊ गल्लीही लवकरचबॉटनिकल गार्डनच्या प्रवेशद्वारासमोर १३ खाऊ गल्लीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. या शिवाय उद्यानात आत दुकानांसाठी पाच स्टॉल लावण्याची सोय आहे. या ठिकाणी लवकरच खाऊ गल्लीही सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्यानाला आणखी दुप्पट प्रतिसाद वाढणार आहे.
शनिवार, रविवारी गर्दी अधिकउद्यानात दररोज तिकिटाच्या माध्यमातून १० ते १५ हजार तर शनिवार, रविवारी २५ हजारांपर्यंत पैसे जमा होतात. या ठिकाणी आता कर्मचारी संख्याही वाढविली असून, आणखी काही सुधारणा करण्यात येणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे.- विजय पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक