सिल्लोड : चार दिवसांवर मुलीचे लग्न असताना वधुपिता सर्जेराव भागाजी साळवे (वय ५५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ एप्रिल रोजी वांगी येथे उघडकीस आली होती. त्या आत्महत्येचे गूढ उकलले असून उसनवारीवर दिलेले १५ लाख रुपये मित्राने परत न दिल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार मयताच्या भावाने सिल्लोड ग्रामीण पोलिसांत दिली आहे. यावरून सदर मित्रावर मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधवराव गोविंदराव राऊत (रा. सिसारखेडा) असे आरोपीचे नाव आहे.
वांगी बु. (ता. सिल्लोड) येथील शेतकरी सर्जेराव साळवे व सिसारखेडा येथील आरोपी माधवराव गोविंदराव राऊत हे दोघे चांगले मित्र होते. ८ महिन्यांपूर्वी सर्जेराव यांनी माधवराव यांना घर बांधण्यासाठी १५ लाख रुपये हात उसने दिले होते. माझ्या मुलीच्या लग्नाला पैसे परत द्यावे, अशी त्यावेळी त्यांनी अट घातली होती. सर्जेराव यांच्या मुलीचे १८ एप्रिल रोजी लग्न ठरले होते. त्यामुळे त्यांनी माधवराव यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र वेळोवेळी मागणी करूनही माधवरावने पैसे परत दिले नाही.
१२ एप्रिल रोजी सर्जेराव रात्रभर माधवराव यांच्या घरी पैशांसाठी मुक्कामी थांबले. मात्र पैसे न देता माधवराव याने सर्जेराव यांना अपमानास्पद वागणूक दिली. पैसे मिळाले नाहीत, तर मुलीचे लग्न कसे करणार, या नैराश्यातच सर्जेराव यांनी १३ एप्रिल रोजी गोठ्यात गळफास घेतला. या प्रकरणी मयताचा भाऊ भगवान साळवे यांच्या फिर्यादीवरून आरोपी माधवराव विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि. लहुजी घोडे करीत आहेत.