औरंगाबाद: हिमायतबाग कट्टा परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी शनिवारी मध्यरात्रीनंतर मृतदेह पेटवून देण्याची घटना उघडकीस आली होती. अर्धवट जळालेल्या अवस्थेतील या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून सुधाकर नारायण चिपटे ( 43, रा. सांगले कॉलनी) असे मृताचे नाव आहे. बहिणीला दारू पिऊन सतत मारहाण करत असल्याने संतापलेल्या भावानेच सुधाकर चिपटे यास संपवल्याचे पुढे आले आहे. राजेश संतोष मोळवड़े असे आरोपीचे नाव आहे.
शहरातील एका खाजगी वाहनावर चालक असलेल्या सुधाकर नारायण चिपटे यास दारूचे व्यसन होते. दारू पिऊन सुधाकर आपल्या पत्नीशी वाद घालत मारहाण करत असे. बहिणीला सतत मारहाण होत असल्याने भाऊ राजेश संतोष मोळवडेचा भावोजीवर राग होता. सहा महिन्यापूर्वी राजेश आपल्या कुटुंबासह बहिणीच्या शेजारीच भाड्याच्या घरात राहण्यास आला. दरम्यान, शनिवारी रात्री घरी कोणी नसल्याचे पाहून राजेशने सुधाकर पवार यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यातच चिपटे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास राजेशने मृतदेह पोत्यात टाकून मोपेडवरून हिमायतबाग कट्टा परिसरात आणला.
येथे डोंगराच्या पायथ्याशी राजेशने मृतदेहावर डीझेल टाकून पेटवून दिला. त्यानंतर राजेश तेथून पसार झाला. दरम्यान, मोठी आग लागल्याचे दिसल्यामुळे परिसरातील फार्म हाऊसवरील नोकराने जाऊन पाहिल्यानंतर मृतदेह जळताना दिसला. त्याने तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास करत आरोपीचा शोध लावला.
असा जळाला मृतदेहहत्या करणाऱ्या राजेशने मृतदेह डोंगराच्या पाठीमागील भागातून दुचाकीवर आणला होता. फार्म हाउसच्या समोरच्या भागातून दुचाकी गेलेली नाही. हे जाळलेल्या ठिकाणापासून २०० मीटर अंतरापर्यंत सांडलेल्या रक्तावरून स्पष्ट होत आहे. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास फार्म हाउसवरील बनकर हे लघुशंकेसाठी उठले. तेव्हा त्यांना आग लागल्याचे दिसले. मृतदेहाच्या शरीराचा समोरील भाग चेहरा, हात, छाती, पोट व पाय हे अर्धवट जळाले होते. पाठीमागील बाजूस डोक्यास मोठी जखम असून, पाठीचा व पायाचा मागील भाग पूर्णत: जळालेला होता.
दुचाकी सीसीटीव्हीत कैदलच्छू पहेलवान यांच्या फार्म हाऊसवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक ॲक्टिव्हा मृतदेह घेऊन येताना कैद झाली आहे. मात्र, त्या दुचाकीचा केवळ अर्धा भागच त्यात आला असल्यामुळे पूर्ण दिसत नाही. दुचाकीच्या समोरच्या जागेत पोते ठेवलेले स्पष्ट दिसून येते. मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये टाकून त्यावर पांढऱ्या रंगाची गोणी चढवली होती. त्यावरून पोते घातल्याचेही अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसले. त्याशिवाय इतरही भागांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास करत आरोपीला ताब्यात घेतले.