छत्रपती संभाजीनगर : वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या कुटुंबावर निपाणीच्या गुंडांनी ५ जुलैला रात्री प्राणघातक हल्ला केला. त्यात डाेके, छातीत चाकू खुपसल्याने गंभीर जखमी झालेल्या रामचंद्र नारायण हिवाळे (३६) यांचा घटनेच्या ३५ तासांनी शुक्रवारी सकाळी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले. मुख्य हल्लेखोर मनोज नानासाहेब भालेकर (३१, रा. निपाणी) याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली.
रामचंद्र यांचे काका रत्नाकर केशवराव हिवाळे (देवळाई) यांचा बुधवारी वाढदिवस असल्याने भाचे, पुतण्यांच्या विनंतीवरून ते जेवणासाठी संतोष हिवाळे, वैभव रत्नाकर हिवाळे, भास्कर कडुबा उडदंगे, सागर गायके आणि दत्ता खरे हे संतोष यांच्या स्कॉर्पिओतून पांढरी पिंपळगावला गेले होते. साडेअकरा वाजता परतत असताना निपाणी फाट्यावर त्यांच्या गाडीसमोर अचानक कार थांबली. सागरने तत्काळ ‘ब्रेक’ दाबल्याने अपघात टळला. त्याने आरोपी चालकाला विचारणा केली. त्यातून त्यांच्यात वाद झाले. हिवाळे वाद मिटवून निघाले; तरीही मनोज व त्याच्या साथीदारांनी पाठलाग करून काही अंतरावर गाडी थांबवून हल्ला केला.
चाकू खुपसलेमनोजसह त्याचा भाऊ मुकुंद भालेकर, रामेश्वर गवारे, विकास घोडके आणि एका अनोळखी व्यक्तीने हिवाळे व इतरांवर हल्ला चढवला. सर्वजण आत असताना काचा फोडून गजाने वार केले. रामेश्वरने सागर गायके आणि रामचंद्र हिवाळे यांच्या डोके, छातीत चाकू खुपसला. मनोज, मुकुंद, विकासने संतोष हिवाळे, भास्कर उडदंगे यांना मारहाण केली. रामचंद्र, सागर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच हल्लेखोरांनी पळ काढला.
१२ जुलैपर्यंत कोठडीमनोजला १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एम. भंडे यांनी शुक्रवारी दिले. सहायक सरकारी वकील शशिकांत ईघारे यांनी न्यायालयास सांगितले की, मनोज यापूर्वीच्या गंभीर गुन्ह्यात जामिनावर आहे. जामिनास विरोधाचे खंडपीठातील अपील अंतिम निकालासाठी प्रलंबित आहे. मुकुंदवर देखील जवाहरनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.