औरंगाबाद : नातीच्या लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या बड्या कंत्राटदाराचा बंगल्याच्या किचनची खिडकी टिकावाने तोडून आतमध्ये प्रवेश करीत साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, १ लाख ७० हजार रुपये रोख असा एकूण ५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना एन ३, सिडको भागातील अजयदीप कॉम्प्लेक्स जवळील बंगल्यात २९ नोव्हेंबर रोजी भर दुपारी घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस तपास करीत आहेत.
शिवाजी अवधूत चव्हाण (रा. प्लॉट नं. १७०, एन ३, सिडको) हे एचव्हीएसी कंपनी अंतर्गत कंत्राट घेण्याचा व्यवसाय करतात. बंगल्यात ते पत्नी, दोन विवाहित मुलांसह राहतात. त्यांच्या नातीच्या लग्नासाठी सर्व कुटुंब कोल्हापूरला गेले होते. हीच संधी साधत एका चोरट्याने २९ नोव्हेंबरच्या भर दुपारी १ वाजता बंगल्याच्या कम्पाउंडवरून प्रवेश केला. सर्व दरवाजे बंद असल्यामुळे चोरट्याने पाठीमागच्या दरवाजाजवळच्या किचन रूम खिडकीची लोखंडी जाळी टिकावाने तोडून प्रवेश केला. त्यानंतर बंगल्यातील खालच्या मजल्यावरील बेडरूम, देवघर, वरच्या मजल्यावरील बेडरूममधील कपाटे उचकटून त्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, तीन लॅपटॉपसह चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला. चव्हाण कुटुंब बुधवारी सकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घरात सगळीकडे सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ पुंडलिकनगर पोलिसांना कळवले. या प्रकरणी गुन्हा नोंदविल्यानंतर अधिक तपास निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक विठ्ठल घोडके करीत आहेत.
बंगल्याला सीसीटीव्हीचा वेढाशिवाजी चव्हाण यांच्या बंगल्याला पाठीमागून, समोरून, बंगल्याच्या आतमधील दोन्ही मजल्यांवर सीसीटीव्ही लावलेले आहेत. सर्व ठिकाणच्या सीसीटीव्हीत चोरटा बंगल्यात प्रवेश केल्यापासून आतमध्ये वावरताना कैद झाला आहे. त्याने तोंडाला रुमाल बांधलेला असल्यामुळे चेहरा ओळखू येत नाही. चोरीच्या एक दिवस आधी सकाळी १०:३० वाजता, दुपारी १ वाजता भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेने एका अनोळखी तरुणास बंगल्याच्या समोर फिरताना पाहिले होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धावएन ३, सिडको येथील बंगल्यात चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त विशाल ढुमे पाटील, निरीक्षक अविनाश आघाव, पुंडलिकनगरचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक निरीक्षक मनोज शिंदे, काशीनाथ महाडुंळे, उपनिरीक्षक विठ्ठल घोडके, शेख आदींनी पाहणी केली.
श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारणघटनास्थळी सायबर शाखा, श्वानपथक, अंगुली मुद्रा तज्ज्ञ यांना पाचारण केले होते. गुन्हे शाखेचे सपोनि. शिंदे, महाडुंळे यांच्या पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही, सर्व बंगल्याचे सीसीटीव्ही तपासण्याची माेहीम रात्री उशिरापर्यंत राबविली. चोरट्याने खिडकीची ग्रील तोडण्यासाठी आणलेला टिकाव घटनास्थळीच सापडला.
‘बडा घर, पोकळ वासा ’एन ३ सिडको भागात अतिशय अलिशान बंगले आहेत. काही बंगल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र, त्यातून बंगल्यांच्या समोरील रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना टिपले जात नाही. बंगल्यातील सीसीटीव्ही केवळ त्यांच्या दरवाजापुरतेच सीमित असल्याचे पोलिसांच्या पाहणीत दिसले.
यापूर्वीही दोन जबरी चोऱ्याएन ३ भागात काही महिन्यांपूर्वी दोन जबरी चोऱ्या झाल्या होत्या. त्यातही लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. विशेष म्हणजे या दोन्ही चोऱ्यांच्या तपासात शहर पोलिसांना यश मिळालेले नाही.