औरंगाबाद : केंद्र शासनाला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीतील हॉटेलमध्ये आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात एका कॅमेरामनचा रक्तदाब कमी झाल्यामुळे तो अचानक भोवळ येऊन कोसळला. त्यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सगळे राजशिष्टाचार सोडून त्या कॅमेरामनकडे धाव घेतली आणि त्याचे प्राण वाचविले. त्याची नाडी तपासताच रक्तदाब कमी झाल्याचे डॉ. कराड यांच्या लक्षात आले. कॅमेरामन शुद्धीवर येईपर्यंत अर्धा तास त्यांनी त्याच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविले.
केंद्रात मंत्री झाल्यानंतर डॉ. कराड यांनी आजवर तीन वेळा सामान्यांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. पहिल्यांदा औरंगाबादेत लेबर कॉलनीतील अपघात झाल्यानंतर एका जखमी मुलाला तातडीने उचलून दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर विमानाने दिल्लीत प्रवास करीत असताना एका प्रवाशाला विमानातच चक्कर आली. त्यानंतर तातडीने डॉ. कराड यांनी त्याला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेप्रकरणी माझ्या मंत्रिमंडळातील मंत्री ‘डाऊन टू अर्थ’ असल्याचे ट्वीटदेखील केले होते.
यानंतर गुरुवारी दिल्लीत केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह इतर मंत्र्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम एका वृत्तवाहिनीसाठी सुरू होता. त्यावेळी एक कॅमेरामन रक्तदाब कमी झाल्यामुळे भोवळ येऊन पडला. त्यालाही डॉ. कराड यांनी प्रयत्न करून शुद्धीवर आणले. दरम्यान, त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
वेळीच धाव घेतल्याने तो वाचलाकेंद्रीय मंत्री गडकरी यांची मुलाखत झाल्यानंतर माझी मुलाखत सुरू होती. माझीही मुलाखत संपली, तेवढ्यात कॅमेरामन पडल्याची ओरड झाली. मी तातडीने त्या दिशेने धाव घेत त्याची नाडी तपासली. त्यानंतर त्याचे पाय वर केले. एक-दोन मिनिटांनी त्याचे पल्स सुरू झाले. छातीवर हात ठेवून हृदय सुरू आहे की नाही हे तपासले. हृदय सुरू होते. त्यानंतर त्याला ग्लुकोज दिले. त्याला उठवून बसविले. पंधरा मिनिटांनी तो शुद्धीवर आला. त्यानंतर त्याला झोपविले. मग पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वेळीच तपासल्यामुळे कॅमेरामच्या जिवाला काहीही धोका झाला नाही, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. कराड यांनी सांगितले.