छत्रपती संभाजीनगर : खिशात रोख सापडली नाही म्हणून तरुण व्यावसायिकाच्या गळ्याला चाकू लावून त्याच्या मोबाइलमधून ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करून लुटले. १७ ऑगस्ट रोजी रात्री ९:३० वाजता एपीआय कॉर्नर येथील देवगिरी बँकेसमोर ही घटना घडली.
फॅब्रिकेशन व्यावसायिक दीपक मधुकर होले (३९, रा. ठाकरेनगर) यांनी १७ ऑगस्ट रोजी रात्री ९:३० वाजता सिडको चौकातून कुटुंबासाठी जेवणाचे पार्सल घेतले. तेथून ते दुचाकीने सर्व्हिस रोडने देवगिरी बँकेच्या दिशेने जात होते. बँकेसमोर त्यांना दोघांनी अडवून अपघाताचे कारण करून नाहक वाद घातला. तेवढ्यात तेथे आणखी दोघे आले. एकाने चाकू काढून त्यांच्या गळ्याला लावला. पैशांची मागणी करून एकाने त्यांच्या खिसे चाचपणे सुरू केले.
खिशात पैसे नसल्याने त्यांचा मोबाइल काढून फोन पे उघडण्यास सांगितले. पासवर्ड टाकायला लावून त्यातील ३ हजार रुपये लुटारूने स्वत:च्या फोन पेवर ट्रान्सफर केली. त्यानंतर हातातील ब्रेसलेट, मोबाइल हिसकावून पसार झाले. हा सर्व प्रकार भर रस्त्यावर रात्री ९:३० वाजता सुरू होता. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सचिन वायाळ करीत आहेत.