भोकरदन : बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या भारत फायनान्स शाखेच्या कॅशियरने साडेअकरा लाख रुपये लंपास केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. सुधाकर यादव अपुलवार (रा. बितमाळ, ता. उमरी, जि. नांदेड) असे संशयिताचे नाव आहे.
कृष्णा वसंत जाधव हे भोकरदन येथील भारत फायनान्समध्ये शाखा व्यवस्थापक आहेत. त्यांच्यासोबत संशयित सुधाकर अपुलवार हा कॅशियर म्हणून काम करतो. अन्य सहकारीही या शाखेत काम करतात. १७ मे रोजी सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे कृष्णा जाधव हे कार्यालयात आले. सकाळी आठ वाजेच्या सुमारास शाखेतील अन्य सहकारी हे वेगवेगळ्या गावांना बचतगटाच्या कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी गेले होते.
शाखा व्यवस्थापक कृष्णा जाधव यांनी सुधाकर यादव अपुलवार याच्याकडे ११ लाख ५१ हजार ५६० रूपये बँकेत भरण्सास दिले. त्यानंतर ते वसुलीसाठी वालसावंगी येथे निघून गेले. सुधाकर हा पैसे बँकेत भरण्यासाठी गेला; परंतु परत माघारी परतलाच नाही. त्याला कॉल केले असता, त्याचा फोनही लागला नाही. याप्रकरणी कृष्णा जाधव यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी भोकरदन पोलिस ठाण्यात संशयित सुधाकर यादव अपुलवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.