छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयऱ्यांच्या शपथपत्राचा आधार घेण्याचा निर्णय घेत राज्यसरकारने अधिसूचना जारी केली. मुंबईला मोर्चा घेऊन निघालेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर शनिवारी सकाळपासून सकल मराठा समाजाच्यावतीने एक मराठा, लाख मराठा, मनोज जरांगे जिंदाबाद, मुख्यंमत्री एकनाथ शिंदे जिंदाबादच्या घोषणा देत, गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील सकल मराठा समाज मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारी रोजी मुंबईला मोर्चा घेऊन निघाला होता. काल २६ जानेवारी रोजी हा मोर्चा मुंबईजवळील वाशी येथे होता. लाखोंच्या संख्येने असलेला मराठा समाज मुंबईत आला तर अनेक समस्या निर्माण होतील, ही बाब लक्षात घेऊन राज्यसरकारच्या शिष्टमंडळांनी जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू केली होती. तेव्हा जरांगे पाटील यांनी आज शनिवारी १२ वाजेपर्यंत निर्णय न घेतल्यास मुंबईला जाण्याचा इशारा दिला होता. रात्रीतून हालचाली झाल्या. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकांनंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेत अधिसूचना जारी केली. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकारी मंत्र्यांसोबत वाशी येथे जाऊन जरांगेंना भेटले. तेथे त्यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे जाहिर केले आणि जरांगे यांचे उपोषण सोडले.
ही बाब कळताच शहरातील मराठा बांधवांनी विविध वसाहतीत जल्लोष केला. क्रांतीचौकात गुलालाची उधळण, फटाके फोडून आणि ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला. या जल्लोषात सहभागी झालेले मराठा बांधव एक मराठा, लाख मराठा, तुमचं, आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मनोज जरांगे पाटील जिंदाबाद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिंदाबाद अशा घोषणा देत आंनद व्यक्त केला. यात महिलांची संख्याही मोठी होती. या जल्लोषात मीना गायके, संगीता जाधव, स्वाती सोन्ने, सुनीता वडजे, ॲड. सुवर्णा माेहिते, उषा कदम, शारदा कदम, शुभ्रा कदम, विजया पवार, जी.के. गाडेकर, पांडुरंग सवने पाटील, आत्माराम शिंदे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.