छत्रपती संभाजीनगर : दरवर्षी उन्हाळ्यात शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पाणीटंचाईच्या झळा बसणाऱ्या नागरिकांकडून आंदोलने केली जातात. शहराला काही प्रमाणात तरी दिलासा मिळावा म्हणून ऐतिहासिक नहर-ए-अंबरीतील पाण्याचा वापर यंदा करण्यात येणार आहे. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने यादृष्टीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
जटवाडा येथील डोंगरातून विविध नहरींचा उगम होतो. शहरात तीन ते चारच नहर सध्या चांगल्या स्थितीत आहेत. उर्वरित नहरींची मागील काही वर्षांमध्ये प्रचंड तोडफोड करण्यात आली आहे. हिमायत बागेच्या आसपास नहर-ए-अंबरीमधून १२ महिने शुद्ध पाणी वाहत असते. या नहरीतून दररोज ४ ते ५ लाख लिटर पाण्याचा उपसा करून ते दिल्लीगेट येथील टाकीत आणण्यात येईल. विद्युत पंपाद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे. त्यासाठी तातडीने स्वच्छतेची कामे हाती करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी दिल्या आहेत. यावेळी उपअभियंता एम. एम. बाविस्कर, कनिष्ठ अभियंता आशिष वाणी, मोरे आदींची उपस्थिती होती.
जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरूहर्सूल तलावात मुबलक पाणी आहे. सध्या दररोज तलावातून दररोज ५ ते ७ एमएलडी पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. या पाण्यावर तब्बल १६ वॉर्डांची तहान भागविण्यात येत आहे. तलावातून अतिरिक्त पाणी घेण्यासाठी मनपाकडे जलशुद्धीकरण केंद्र नाही. नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी मंगळवारी जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाचा तसेच पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला.