छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री चिकलठाणा विमानतळावर आमदार संजय शिरसाट यांनाच तुम्ही निवडणूक लढता का, असे विचारले. मात्र आपण लोकसभा लढण्यास इच्छुक नसल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगून टाकले, अशी माहिती स्वत: आ. शिरसाट यांनीच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
भाजप आणि शिंदेसेनेत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असली तरी ही जागा शिंदेसेनेकडे गेल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेकडून मंत्री संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील हे इच्छुक आहेत. मात्र महायुतीमधील जागा वाटपाचा घोळ न संपल्याने शिंदेसेनेने औरंगाबादच्या उमेदवाराची घोषणा लांबविली आहे.
मुख्यमंत्री शिंदे चिकलठाणा विमानतळावर आले असता त्यांच्या स्वागतासाठी आ. शिरसाट, जंजाळ आणि विनोद पाटील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी उमेदवाराविषयी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी आ. शिरसाट यांनाच ‘तुम्ही औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढविता का?’ अशी विचारणा केली. तेव्हा आ. शिरसाट यांनी दिल्लीला जाण्यास इच्छुक नसल्याचे नम्रपणे सांगितले.
रात्री घडलेला हा किस्सा आ. शिरसाट यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी शेअर केला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी काही दिवसापूर्वी औरंगाबाद लोकसभेसाठी आ. शिरसाट हे भुमरेपेक्षा सरस उमेदवार असल्याचे विधान केले होते.
मुख्यमंत्री आज घेणार निर्णय आमच्याकडे पालकमंत्री संदीपान भुमरे, राजेंद्र जंजाळ आणि विनोद पाटील हे तीन जण इच्छुक आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारीसंदर्भात मंगळवारी निर्णय घेणार असल्याचे शिंदेसेनेचे प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी सांगितले.
नाशिकची जागा देखील शिवसेनेचीनाशिकची जागा राष्ट्रवादीला हवी असल्याचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाल्याकडे आ. शिरसाट यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, महायुतीमध्ये सामजंस्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनीच घ्यायची का, असा सवाल केला. पटेल यांनी उगाच उड्या मारू नये, नाशिकची , छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेचीच आहे. ही मिळविण्यासाठी प्रतिष्ठापणाला लागली असल्याचेही ते म्हणाले. रत्नागिरी जागेसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील.