छत्रपती संभाजीनगर: भिडे गुरूजींनी वादग्रस्त वक्तव्य करू नये, दरवेळी अशा पद्धतीन वादग्रस्त वक्तव्य करायचं हे योग्य नाही. याआधी आंबे खा मुलं होईल असे ते म्हणाले होते. जे तोंडात येईल ते बोलायचं हे योग्य नाही. आपणही त्यांचा निषेध करतो. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेवर कारवाई झाली पाहिजे, अशी आपण मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भिडेंवर कारवाई करतील, असा विश्वास शिवसेनेचे प्रवक्ता आ.संजय शिरसाट यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत येणारे संभाजी भिडे यांनी दोन दिवसापूर्वी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. भाजपने भिडे गुरूजीविषयी मौन बाळगले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी मात्र शनिवारी पत्रकारांशी बोलताना भिडे गुरूजीवंर हल्लाबोल केला.
ते म्हणाले की, काही दिवसापूर्वी एका पत्रकार तरूणीने टिकली लावली नाही, म्हणून भिडेंनी तिच्यासोबत बोलण्यास नकार दिला होता. भिडेंना दुसऱ्यांच्या पूर्वजाबद्दल बोलण्याचा कोणी अधिकार दिला. स्वत:च्या पूर्वजाबद्दल तुम्ही का बोलत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोणीही काहीही बोलणार आणि समाजात तेढ निर्माण करणार असेल तर ते सरकार सहन करणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे. यामुळे मतासाठी अथवा राजकारणासाठी आम्ही चुकीच्या व्यक्तीला पाठिशी घालणार नाही. भिडे गुरुजीवर कारवाई व्हावी, यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशीही बोलणार असल्याचे आ. शिरसाट यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंना त्यांच्याच शिवसैनिकांच्या शुभेच्छा स्विकारल्या नाहीउद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गेला होता का, या प्रश्नाचे उत्तर देताना आ. शिरसाट म्हणाले की, शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेलेल्या शिवसैनिकांना भेटण्यासाठी ते खाली आले नाही. त्यांच्याच पक्षाच्या शिवसैनिकांच्या शुभेच्छा स्विकारल्या नाही. आम्ही तर किती दूर आहोत.