छत्रपती संभाजीनगर : प्राध्यापक नुसता विद्वान असून चालत नाही, तर तो बहुश्रुत असला पाहिजे. आपला विषय अधिकाधिक माहितीपूर्ण व रंजक करून शिकविण्याची त्याच्यात धमक असली पाहिजे, अशी अपेक्षा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची होती. एकदा मिलिंद महाविद्यालयात कोणाचेही लक्ष नसताना इंग्रजीच्या तासाला मागच्या बेंचवर बसून बाबासाहेब हे शिक्षक कसा शिकवतो, याचे निरीक्षण करत होते. तास संपला तेव्हा सर्वांचे लक्ष बाबासाहेबांकडे गेले. तेव्हा ‘कम प्रिपेअर फ्रॉम नेक्स्ट टाईम’ बाबासाहेबांचे हे शब्द ऐकून त्या प्राध्यापकांची काय अवस्था झाली असेल, हे शब्दांत सांगणे कठिण आहे.
१९५५ साली मिलिंद महाविद्यालयात इंटरमीडिएटला प्रवेश घेतलेले अनंत रंगनाथ पाठक हे बाबासाहेबांच्या आठवणी सांगताना अत्यंत भावनिक झाले. ‘छत्रपती संभाजीनगर तथा पूर्वीचे औरंगाबाद, मिलिंद महाविद्यालय आणि डॉ. आंबेडकर’ यांच्या आठवणी संग्रहित करणारे प्राचार्य डॉ. एम. ए. वाहुळ आणि डॉ. जे. एम. मंत्री यांच्या माध्यमातून ८७ वर्षीय प्रा. अनंत पाठक यांच्याबाबत माहिती समजली आणि ‘लोकमत’ने थेट प्रा. पाठक यांची भेट घेऊन बाबासाहेबांच्या आठवणी जाणून घेतल्या.
प्रा. पाठक सांगतात, शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचा उद्धार करावा, अशी अपेक्षा बाबासाहेबांची होती. १९५५ साली दहावी उत्तीर्ण झाल्यावर मी आणि माझा मित्र सिंदखेड राजा येथून पुढील शिक्षणासाठी मिलिंद महाविद्यालयात आलो. इंटरमीडिएटला प्रवेश घेतल्यानंतर या अनोळखी शहरात कुठे राहावे, हा प्रश्न होता. कॉलेजचे वसतिगृह होते. पण, ते विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र येथील विद्यार्थ्यांनी हाऊस फुल्ल झाले होते. काही दिवस वसतिगृहात राहिलो. त्यानंतर छावणीतील गवळीपुरा येथे भाड्याची खोली घेतली. तेव्हा स्टोव्ह नव्हते. आम्ही एक चूल मांडून त्यावरच स्वयंपाक करायचो.
एकेदिवशी स्वयंपाक करण्यास उशीर झाला. घाईगडबडीत जेवण केले आणि एक वही घेऊन पळत पळत क्लासला गेलो. तोपर्यंत तास सुरू झाला होता. इंग्रजीचा तास सुरू होता. त्यामुळे मागच्या दरवाजातून वर्गात जाण्याचा प्रयत्न करताच समोर उंचीपुरी, धडधाकट मूर्ती उभी होती. ते विद्वान पंडित डॉ. बाबासाहेब आंबेडकरच असल्याचे मनोमनी मी ओळखले. बाबासाहेब म्हणाले, थांब, एवढा उशिरा का आलास? हे ऐकून माझी तर पाचावर धारण बसली. त्यावर बाबासाहेब म्हणाले, एवढे घाबरायला काय झाले. मी तुमच्यासाठी एवढे मोठे कॉलेज उभारले, तुम्हाला त्याची किंमत नाही. हाताने जेवण बनवतोस काय? मी म्हणालो, होय साहेब. मग, बाबासाहेब म्हणाले, मला कल्पना आहे त्याची. यापुढे क्लासला उशीर होता कामा नये. वेळेवर येत जा.
प्रा. पाठक सांगतात, मागच्या बेंचवर जाऊन बसलो. काही वेळाने बाबासाहेब माझ्या जवळ येऊन बेंचवर बसले. वर्गात शिकवणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही याची कल्पना नव्हती. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. आंबेडकर माझ्याजवळ बसल्यामुळे माझी काय अवस्था झाली असेल? असो क्लास संपण्यापूर्वी मागे बाबासाहेब बसलेले आहेत, याची सर्वांना कुणकुण लागली. क्लास संपला तसे बाबासाहेब उठले आणि इंग्रजी शिकविणाऱ्या त्या प्राध्यापकाला एवढेच म्हणाले, ‘कम प्रिपेअर फ्रॉम नेक्स्ट टाईम’. हे शब्द ऐकून त्या शिक्षकाच्या अंगातील त्राणच गेले. (या आठवणी सांगताना काही क्षण का होईना, पण, प्रत्यक्ष महामानवाचे सान्निध्य आपणास लाभले, याचे समाधान व औत्सुक्य प्रा. पाठक यांच्या चेहऱ्यावर क्षणोक्षणी जाणवत होते.)