- विजय थोरातनाचनवेल (जि.औरंगाबाद) : मूर्खपणा करणाऱ्या व्यक्तींसाठी गाढवाची उपमा दिली जाते, परंतु खऱ्याखुऱ्या गाढवांनी जर माणसांना मूर्ख बनविल्याचे कोणी म्हटले, तर यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र, कन्नड तालुक्यातील नाचनवेलमध्ये गाढवांनी त्यांना चोरण्यासाठी आलेल्या चोरांनाच गाढव (मूर्ख) बनवून आम्ही किती स्मार्ट आहोत, हे दाखवून दिले आहे.
नाचनवेलचे सुरेश शेषराव मोटे हे आपल्या मालकीच्या २० गाढवांच्या मदतीने विटा व इतर बांधकाम साहित्याची वाहतूक आणि मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. गुरुवारी सायंकाळी (दि.२३) काम आटोपल्यावर नेहमीप्रमाणे त्यांनी आपली गाढवे नदीकाठी बांधली व घरी परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते नेहमीप्रमाणे तेथे गेले असता, गाढव गायब असल्याचे दिसले. हे पाहून सुरेश मोटे यांना घाम फुटला. त्यांनी कुटुंबीयांसह गावभर शोधाशोध केल्यानंतर त्यांची सर्व गाढवे इतरत्र विखुरलेल्या अवस्थेत मिळून आली.
सीसीटीव्ही फुटेजने उलगडले रहस्यगाढवांचे दोर कोणी व कशासाठी कापले असावे, असा प्रश्न सुरेश मोटे यांना पडला होता. यानंतर, त्यांनी शोध सुरू केला. ग्रामपंचायतीमार्फत शाळा व हनुमान मंदिर परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ‘त्या’ मध्यरात्री झालेल्या अयशस्वी चोरीचा सर्व घटनाक्रम कैद झाला होता. पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी सुरुवातीला चार गाढवे पळविण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या साथीदारांना सोडून जायला गर्दभराज राजी नव्हते, त्यामुळे चोरट्यांनी सर्वच गाढवांचे दोर कापले व हाकून गावाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मालकाशी इमानदार असलेल्या गाढवांना मात्र चोरट्यांचा हा डाव लक्षात आला असावा, त्यांनी गावापर्यंत आल्यानंतर गटागटाने वेगवेगळी गल्ली धरून सैरावैरा पळायला सुरुवात केली. यामुळे चोरटे हतबल झाले. तासभर प्रयत्न करून एकही गाढव हाती लागत नसल्याने चोरटे निराश झाले व त्यांना हात हलवत परत फिरावे लागले.
गावकऱ्यांकडून गाढवांचे कौतुकजनावरे चोरीच्या घटनांमध्ये चोरीस गेलेली जनावरे व चोरट्यांचा तपास लागण्याचे प्रमाण नगण्य आहे, परंतु मोटे यांच्या गाढवांनी मात्र इतर प्राण्यांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे दाखवित गाव सोडण्यास सपशेल नकार दिल्याने गावकऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे. गाढवांचे मालक सुरेश मोटे यांनी पिशोर पोलीस ठाण्यात गाढव चोरीच्या प्रयत्नाची फिर्याद दिली आहे. यामुळे पोलिसांसमोर आता चोरट्यांना शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
व्यावसायिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेग्रामपंचायतीने शाळा, बाजारपेठ, तसेच सामाजिक सभागृह परिसरात कॅमेरे बसविले आहेत. बस स्टँडवरील दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांनीही ते बसवावेत, ज्यामुळे चोरी व गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होईल.- छायाबाई थोरात, सरपंच, नाचनवेल.