छत्रपती संभाजीनगर : वैजापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. याठिकाणी वैजापूरसह गंगापूर तालुक्यातील वाहनांसंबंधी कामकाज चालणार आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांतील वाहनधारकांच्या वाहनांसंबंधी कामासाठी छत्रपती संभाजीनगरला होणाऱ्या चकरा थांबणार आहेत.
राज्यात लातूर, जळगाव याठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यात येत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये या कार्यालयाची प्रतीक्षाच करावी लागत होती. ‘लोकमत’ने ‘पीपल्स मॅनिफेस्टो’च्या माध्यमातून जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय का नाही, याकडे लक्ष वेधले होते. यासंदर्भात २२ एप्रिल रोजी २०२४ रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. अखेर तब्बल १८ लाखांवर वाहन संख्या असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यास ऑक्टोबरमध्ये शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. ‘एमएच-५७’ अशी नवीन ओळख वैजापूरची आता राज्यभर असणार आहे. वैजापूर येथे उपप्रादेशिक कार्यालयासाठी आवश्यक असलेली जागाही जवळपास निश्चित झाली आहे. लवकरच याठिकाणी कामकाज सुरू करण्यात येणार आहे.
केवळ ‘लाॅगिन आयडी’ची प्रतीक्षावाहनासंबंधी कामकाज करण्यासाठी केवळ आता ‘लाॅगिन आयडी’ची प्रतीक्षा आहे. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने यांच्याकडे वैजापूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदाचा पदभार देण्यात आलेला आहे. २ निरीक्षक, ४ क्लार्कदेखील राहतील. कार्यालयासाठी जागेचेही नियोजन झाले आहे. वैजापूरसह गंगापूर तालुक्यातील वाहनांसंबंधी कामकाज वैजापूर येथून चालेल. केवळ फिटनेससाठी करोडी येथे यावे लागेल.-विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी