औरंगाबाद : ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा, डोळ्यांचे पारणे फेडणारी आतषबाजी, ढोल-ताशांच्या दणदणाटात हजारो शिवभक्तांनी याचि देही, याचि डोळा पाहिला शिवरायांच्या पुतळ्याचा (Chatrapati Shivaji Maharaj) भव्य राजेशाही अनावरण सोहळा.
शिवजयंतीला अवघे काही तास उरले असताना क्रांतीचौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी रात्री मोठ्या थाटात अनावरण झाले. चार वर्षांपासून पुतळ्याची प्रतीक्षा करणाऱ्या शहरातील लाखो शिवभक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आबालवृद्ध सहकुटुंब सहभागी झाले होते. डी.जे.च्या तालावर हजारो शिवभक्त जल्लोष करीत होते. सायंकाळी ४ वाजेपासून एन-७ सिडको येथील मराठा वादळ प्रतिष्ठानचे १०१ तरुण, तरुणींंचे ढोलपथक पृथ्वीराज राठोड यांच्या नेतृत्वाखाली रात्री ९ वाजेपर्यंत ढोल वाजवीत होते. रात्री ९ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अन्य विविध २२ पथकांचे एकत्रितपणे क्रांतीचौक ते नूतन कॉलनी रस्त्यावर ढोल वाजवीत होते. या पथकांच्या तालावर हजारो तरुण, तरुणी जल्लोष करीत होते. मनमोहक लाइट शो, लेझर शो, फटाक्यांच्या आतषबाजीने समारोहाची रंगत वाढविली. छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण होताच, हजारोंनी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयजयकार केला. मध्यरात्री १२ वाजेपर्यंत क्रांतीचौक परिसरात हजारो शिवप्रेमी भगवा ध्वज फडकावत होते.
परिसरातील इमारतीचे टेरेस बनले प्रेक्षागृहक्रांतीचौकातील शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभासाठी हजारोंची गर्दी उसळल्याने क्रांतीचौकाला मिळणारे सर्व रस्ते जाम झाले होते. चौकात पाय ठेवायलाही जागा नव्हती. एवढेच नव्हे तर क्रांतीचौकातील आजूबाजूच्या इमारतींच्या गॅलरीत आणि गच्चीवर बसून नागरीक सोहळा पाहत होते.
वीसहून अधिक ढोलपथकांचे एकत्रित सादरीकरणशहरातील लहान-मोठ्या वीसहून अधिक ढोलपथकांनी १२ वाजेपर्यंत केलेल्या उत्तम सादरीकरणाने उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडले. ऋषिकेश जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे सादरीकरण झाले.
गर्दीमुळे आच्छादन काढलेछत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी सायंकाळी ६ वाजेपासून हजारोंनी क्रांतीचौकात गर्दी केली होती. हे पाहून संयोजकांनी गर्दी कमी व्हावी, पुतळा पाहून नागरिक निघून जातील, या उद्देशाने रात्री ९ वाजताच पुतळ्याचे आच्छादन काढले. मात्र, यानंतर गर्दी कमी होण्याऐवजी ती वाढतच गेली.
भाषण आणि स्वागताला फाटाया सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी प्रतीक्षा करीत असल्याचे पाहून संयोजकांनी शब्दसुमनांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. गर्दीचे गांभीर्य ओळखून सर्व नेत्यांची भाषणे व सत्कार रद्द करण्यात आला.
सतत तीन वर्ष चालले काम१९ फेब्रुवारी २०१८ ला शिवजयंती उत्सव समाप्त झाल्यांनतर क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुना अश्वारूढ पुतळा काढून पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले. मागील सतत तीन वर्षे शिवरायांच्या पुतळ्याविनाच शिवजयंती साजरी झाली होती.