वैजापूर : विहिरीचे काम सुरू असताना वायर रोप तुटून क्रेन विहिरीत पडली. या दुर्घटनेत क्रेनचालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील बोरसर येथे रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने विहिरीत काम करणारे चार कामगार बचावले. जनार्दन ऊर्फ रवींद्र सुधाकर पवार (वय ३२) असे या घटनेतील मयताचे नाव आहे.
रवींद्र पवार यांची भिवगाव शिवरात गट क्रमांक ६२ मध्ये शेती आहे. रविवारी त्याच्या शेतात विहिरीचे काम स्वतःच्या क्रेनने सुरू होते. रवींद्र पवार हेच स्वतः क्रेन चालवित होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास काम सुरू असताना अचानक क्रेनचे वायर रोप तुटले व क्रेनसह रवींद्र पवार हे विहिरीत पडले. विहिरीत पडल्यानंतर क्रेन हे २५ फुटांवरच अडकली. मात्र रवींद्र पवार हे ६५ फूट खोल विहिरीत पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा विहिरीच्या तळाशी चार कामगार काम करीत होते. सुदैवाने क्रेन मध्येच अडकल्याने त्यांचा जीव वाचला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत दोरीच्या साहाय्याने चौघांना विहिरीबाहेर काढले. घटनास्थळी वैजापूर ठाण्याचे सपोनि. घोडके, पोउनि. रज्जाक शेख, पोकॉ. पडवळ यांनी भेट देऊन पंचनामा केला. ग्रामस्थांनी हायड्रा क्रेनच्या साहाय्याने क्रेन विहिरीबाहेर काढली. तसेच रवींद्र यांचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी साडेसहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी वैजापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.