छत्रपती संभाजीनगर :आरोग्यविषयक जनजागृतीमुळे नागरिकांत व्यायाम करण्याची क्रेझ वाढत आहे. मात्र, तज्ज्ञांचे मार्गदर्शन न घेता लवकर जास्त तंदुरुस्त दिसावे यासाठी अतिव्यायाम करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मात्र, शारीरिकदृष्ट्या अतिशय तंदुरुस्त असलेले छत्रपती संभाजीनगरचे माजी क्रिकेटपटू शेख हबीब आणि बुधवारी गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सामन्यादरम्यान प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू इम्रान पटेलचे मैदानात कोसळून रुग्णालयात निधन होणे, तसेच जिममध्ये व्यायाम करतानाही अकस्मात मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असतानाही अकस्मात मृत्यूच्या दुर्दैवी घटनांमुळे छत्रपती संभाजीनगरचे क्रीडा क्षेत्र हादरले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी घेतलेला हा मागोवा.
अतिव्यायामामुळे अनेक समस्याहृदयाला रक्तपुरवठा करणारी वाहिनी जर बंद पडली तर हृदयविकार होतो. हृदयात मध्यम व मामुली ब्लॉक असतील तर हे ब्लॉक अतिश्रमाच्या अतिव्यायामामुळे तुटतात, तसेच ब्लॉकमुळे रक्ताची गुठळी तयार होते. ही गुठळी मोठी झाली तर रक्तवाहिनी बंद होते. त्यामुळे आकस्मिक मृत्यूच्या घटना घडतात. तसेच दुसरे आकस्मिक मृत्यूचे कारण म्हणजे, अतिव्यायामामुळे हृदयाच्या स्नायूंना सूज येते व या सुजेमुळे अनियमित व अतिजलद ठोके निर्माण होऊन हृदय बंद पडते. याशिवाय आकस्मिक मृत्यू होणाऱ्यांमध्ये अनेक कारणे आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, चरबीचे रक्तातील अधिक प्रमाण व आनुवंशिकता आदी कारणांमुळे हृदयविकार होण्याचे प्रमाण अधिक आहे.-डॉ. विलास मगरकर, हृदयरोगतज्ज्ञ
भेसळयुक्त आहार कारणीभूतवैद्यकीय चाचणी न केल्यामुळे शारीरिक तंदुरुस्त जरी असलो तरी शरीरातील पचन, श्वसन आणि हृदयसंस्था यांचे कार्य कसे चालले आहे, हे कळू शकत नाही. खेळाडूंच्या आकस्मिक मृत्यूस अत्यंत भेसळयुक्त आहार, जेवण्याच्या अवेळी सवयी, यामुळे कोलेस्ट्रोल वाढते, त्याचा लिव्हर व किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे अशा दुर्घटना घडतात.- मकरंद जोशी,प्रशिक्षक, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त
सल्ला घेऊन करा व्यायामसकस आहार न घेणे, स्टेराॅइडचे सेवन, हायकॅलरी डाएट, काॅर्डिओ न करणे आणि तज्ज्ञांचा सल्ला न घेता ताकद वाढविण्यासाठी मेडिसिन घेणे यामुळे दुर्घटना घडत आहेत, तसेच कधीही व्यायाम न करणारे व योग्य आहार न घेणारे अतिव्यायाम करतात, त्यावेळीही अशा दुर्घटना घडतात.-विक्रम जाधव, फिटनेस कोच, भारतश्री
अवेळी जेवण, पुरेशी विश्रांती न घेणेअनेकांना हृदयरोग, मधुमेह असे आनुवंशिक आजार असू शकतात. मात्र, मेडिकल चेकअप न करणे, पोषक आहार न घेणे, ताणतणाव, अवेळी जेवण, वेळेवर न झोपणे, पुरेशी विश्रांती न घेणे, यामुळेही अशा दुर्घटना घडतात. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी मेडिकल चेकअप करणे आवश्यक आहे.- डॉ. प्रफुल्ल जटाळे, न्यूक्लिअर मेडिसिनतज्ज्ञ, मॅरेथॉन रनर व सायकलपटू
नियमित तपासण्या कराव्यातअनेक खेळाडूंना श्वासोच्छ्वासाचा त्रास असतो. त्यामुळे खेळाडूंनी मेडिकल चेकअप केल्यास दुर्घटना टळू शकतात. खेळाडूंसाठी स्पोर्ट्स सायन्सदेखील महत्त्वाचे आहे. कामगिरीचा दबाव न घेता खेळाडूंसाठी शारीरिकदृष्ट्याच तंदुरुस्त न राहता, सकस आहार, पाणी, योग्य प्रमाणात प्रोटीन घेणे, तसेच मेंटली फिटनेसदेखील महत्त्वाची आहे. त्यावर लक्ष द्यायला हवे. अतिव्यायाम करणारे काही जण स्टेरॉइडही घेतात. त्यामुळे जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांचा आकस्मिक मृत्यू होतो.-अनघा खैरनार, फिजिओ, भारतीय क्रीडा प्राधिकरण