औरंगाबाद : अमृत डेव्हलपर्सच्या मालकाला नोकरानेच २४ लाख रुपयांना फसविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी नोकराच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक विजय रामदास सक्करवार (रा.गोल्डन सिटी, ईटखेडा) यांच्याकडे १५ वर्षांपासून बाबासाहेब बाळासाहेब डुकरे (रा.जालाननगर) हा हिशोबनीस म्हणून २०१९ पर्यंत कामाला होता. त्याच्याकडे संस्थेचे आर्थिक व्यवहार, हिशोबाची कागदपत्रे, ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांच्या नोंदीसह धनादेश तयार करण्याचे काम होते. विश्वासू नोकर असल्यामुळे त्याच्याकडे कोऱ्या धनादेशावर सह्या करून ठेवण्यात येत होत्या. २०१९ मध्ये त्याने अनेक बाबतीत अफरातफर केल्याचे दिसून आले. चौकशी केल्यानंतर त्याने अफरातफरीची कबुलीही दिली. भविष्यात असे करणार नाही, असे आश्वासन दिले. त्यानंतर, बिल्डरने काही दिवसानंतर त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेत, मार्च, २०१९ मध्ये कामावरून काढून टाकले.
नंतर अनेक हिशोबांची तपासणी केली असता, मोठी अफरातफर आढळून आली. त्यामुळे त्यास १ जून, २०१९ रोजी बोलावून बैठक घेतली. त्यातही त्याने अफरातफर मान्य करून बॉन्डवर लिहून दिले, तसेच त्याबाबतचे धनादेशही दिले. ते धनादेश अनादरित झाले. त्यामुळे डुकरेला वकिलामार्फत नोटीस पाठवून दावे दाखल केले. या सर्व प्रकारानंतर बिल्डरचा १२ जानेवारी, २०२२ रोजी २४ लाख रुपयांचा धनादेश पैसे नसल्यामुळे अनादरित झाला. चेेकबुक पाहिले असता, ७१ ते ९५ या क्रमांकाचे धनादेश गायब असल्याचे समोर आले. हे धनादेश डुकरे यानेच गायब केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंडे करीत आहेत.
नोकराची मालकाला नोटीसडुकरे याने मालक सक्करवार यांना वकिलामार्फत २८ जानेवारी, २०२२ रोजी नोटीस पाठवत धनादेश अनादरित झाल्याचे म्हटले. त्यामुळे ७१ ते ९५ क्रमांकाचे धनादेश डुकरे यानेच आर्थिक फायद्यासाठी विश्वासघाताने नेत, २४ लाख रुपयांना फसविण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.