छत्रपती संभाजीनगर : राज्याचा सध्याचा कारभार ढिसाळ असून भ्रष्टाचार खूप बोकाळला आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सरकारवर घणाघात केला.
त्यांनी सांगितले की, राज्यात सध्या जे चालू आहे, त्यांच्याशी जनतेला काही देणंघेणं नाही. महागाई, बेरोजगारी हे प्रश्न महत्त्वाचे असून जनता त्यात होरपळून निघत आहे. काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून जाहिरात शिवसेनेने ( शिंदे गटाने) दिली. जाहिरात त्यांनीच दिली, ती दुसऱ्या दिवशी त्यांनीच बदलली. परत म्हणतात, याच्याशी आमचा काहीच संबंध नाही, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.त्यांनी आणखी सांगितले की, यांना ५० खोकेवाले म्हटल्यानंतर राग यायचा. परंतु नांदेडला भाजपनेच डिवचले, '' ५० खोके, भाजपचे १०५ डोके'' या बॅनरमधून पन्नास खोक्यांचा केला जात असलेला आरोप खरा ठरतोय.
आता हे म्हणताहेत, आम्ही जय - विजयची जोडी आहोत. गावाकडे बैलजोड्या असतात ‘सर्जा -राजा’ असे म्हणत पवार यांनी टोला लगावला. ते म्हणाले, फेव्हिकॉलचा जोड आहोत, हे सांगायची वेळ तुमच्यावर आली. यातच सारं आलं. बेरोजगारी, महागाई हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. महिलांवरचे अन्याय अत्याचार वाढताहेत. जातीय तेढ वाढतेय. म्हणून यांना सांगावं वाटतं, राज्य कारभाराकडे लक्ष द्या, असा सल्ला अजितदादांनी यावेळी शिंदे- फडणवीस यांना दिला. यावेळी राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, सुरजितसिंग खुंगर आदींची उपस्थिती होती.