छत्रपती संभाजीनगर: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी केलेला अर्ज शासनाने आज मंजूर झाला आहे. धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून परिचित असलेल्या केंद्रेकर यांनी अचानक व्हीआरएस घेतल्याने नागरिक तसेच प्रशासनात आश्चर्य व्यक्त होत आहे.
विभागिय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शासनाकडे गेल्या महिन्यात व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यानुसार त्यांचा अर्ज आज मंजूर करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात शेतकरी कुटुंब पाहणीअंती त्यांनी दोन हंगामात १० हजार एकरी मदत शेतकऱ्यांना देण्याचं मत व्यक्त केले होते, यावरून सरकार व सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याचे बोलले गेले. दरम्यान त्यांनी व्हीआरएससाठी अर्ज केला होता, त्यांचे दोन ते अडीच वर्ष सेवेचे बाकी होते. फेब्रुवारी २०१९ मध्ये ते आयुक्त म्हणून रुजू झाले होते. शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण त्यांच्या नेतृ्वाखाली पूर्ण व्हावी यासाठी कोर्टाने देखील ३० जून २०२३ पर्यंत त्यांची बदली रोखली होती.
आपल्या साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध असलेले सुनील केंद्रेकर सध्या विभागीय आयुक्त आहेत. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेतला होता. केंद्रेकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त या पदावर काम केले. त्यानंतर त्यांची कृषी आयुक्त पुणे या पदावर बदली झाली. नंतर क्रीडा विभागात बदली झाली. त्यानंतर ते विभागीय आयुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे परतले.
मला "माननीय' म्हणू नका साधी राहणीमान आणि लोकांत मिसळून काम करणारे, कोणत्याही दबावाला बळी न पडणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. मागील वर्षी कामानिमित्त खुलताबाद येथे गेले असता पत्नीसह त्यांनी बाजार केल्याचे फोटो व्हायरल झाले होते. अगदी खांद्यावर पिशवी घेऊन केंद्रेकर यांनी बाजार केला होता. दरम्यान, त्यांनी पुणे येथे कृषी आयुक्त असताना, मला माननीय, सर वगैरे म्हणू नका, अशी भूमिका घेत तसे परिपत्रकच काढले होते. अधिकारपदामुळे मिळणारी "विशेष प्रतिष्ठा' नाकारण्याचे धाडस नाकारणारा, लोकांची नेमकी अडचण ओळखणारा अधिकारी अधिक काळ जनसेवेत राहावा अशी भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.