छत्रपती संभाजीनगर : जुन्या बीड बायपास रस्त्याने चिकलठाण्याकडे घरी जात असलेल्या ३३ वर्षीय महिलेला रविवारी (दि. २) भरदुपारी तीन नराधमांनी उचलून नेत काटेरी झुडपात नेले. तेथे झाडाला तिचे हात बांधून आळीपाळीने अत्याचार केल्यानंतर तिचा खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि. ३) उघडकीस आली. बलात्कार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी दिली.
राहुल संजय जाधव (१९, रा. ऋषिकेशनगर, बकाल वस्ती, चिकलठाणा), प्रीतम ऊर्फ सोनू महेंद्र नरवडे (२४) आणि रवी रमेश गायकवाड (३४, दोघे रा. सदर) अशी अत्याचार करणाऱ्या अटकेतील आरोपींची नावे आहेत. सिल्लोड तालुक्यातील एक कुटुंब विमानतळ परिसरात राहून मोलमजुरी करीत उदारनिर्वाह करते. विमानतळाच्या जवळून जाणाऱ्या जुन्या बायपास परिसरातील एक चर्च आहे. पती सकाळी मिस्तरी कामावर गेल्यानंतर पीडित संगीता (नाव बदलेले) मुलांना शाळेत सोडून त्या परिसरातील चर्चमध्ये दुपारी शाळा संपेपर्यंत प्रार्थना करीत असत. चर्चमध्ये कार्यक्रम असल्यामुळे मुलांना घेऊन त्या रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास गेल्या. मात्र, मासिक पाळी सुरू होऊन पोट दुखू लागल्यामुळे त्या मुलांना चर्चमध्ये थांबवून घराकडे निघाल्या. संगीताचे घर चर्चपासून हे अडीच किमी अंतरावर आहे. विमानतळाच्या भिंतीलगत वेड्या बाभळीच्या झाडांतून रस्त्याने त्या जात होत्या. तेथे नशा करीत बसलेल्या तीन आरोपींनी त्यांना अडविले. आरोपींनी मारहाण करून त्यांना उचलून वेड्या बाभळीमध्ये नेले. यादरम्यान, बरीच झटापट झाली. मात्र, संगीताचा टाहो ऐकण्यासाठी त्या परिसरात कोणीच नव्हते. आरोपींनी तोंडू दाबून त्यांचे हात झाडाला बांधून आळीपाळीने बलात्कार केला. त्यांच्या गुप्तांगावरही मारहाण करण्यात आली. तरीही त्यांचा प्रतिकार थांबत नव्हता. अखेर, आरोपींनी तीक्ष्ण दगडाने ठेचून निर्घृण खून केला आणि ते निघून गेले. या परिसरात खून झाल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संगीताच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून खुनासह सामूहिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवित आरोपींना अटक केली आहे.
मृतदेहाची माहिती मुलाने दिलीसंगीता १ वाजेच्या सुमारास चर्चमधून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्यांचा लहान मुलगा चर्चमधून घराकडे जाण्यास निघाला. रस्त्याने जाताना त्यास भिंतीलगत एका महिलेचा मृतदेह दिसला. त्याने घरी आल्यानंतर काहींना ही माहिती दिली. मात्र, सगळ्यांनीच त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हा त्याने सात वर्षाच्या मोठ्या भावाला सांगितले. त्याने चुलत्यास माहिती दिल्यानंतर त्यांनी इतरांसोबत धाव घेतली. तेव्हा माहिती देणाऱ्या मुलांचीच आई निघाल्याचे पोलिसांनी सांगितले.
बकाल वस्तीपर्यंत पोहोचले श्वानघटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी तपास सुरू केला. श्वानपथकालाही पाचारण केले. घटनास्थळी पडलेल्या घड्याळाचा वास घेऊन श्वान परिसरातील बकाल वस्तीपर्यंत पोहोचले. त्यामुळे गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पोलिस हवालदार महेश उगले, नितीन सुदंर्डे हे बकाल वस्तीचे निरीक्षण करू लागले. तेव्हा त्यांना राहुल जाधव हा तेथून निघून जाण्याच्या तयारीत दिसला. पथकाला संशय आल्यामुळे त्यांनी त्यास हटकले असता त्याच्या हाताला काट्याने ओरबाडल्याचे दिसले. तेव्हा त्यास घटनास्थळावर नेण्यात आले. त्याठिकाणी गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, गौतम पातारे, अंमलदार विरेश बने, दादासाहेब झारगड, नितीन देशमुख, संतोष गायवकड, देविदास काळे यांनी चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने रवी गायकवाड व प्रीतम नरवडे यांची नावे सांगितली.
एका आरोपीची होती पाळतमृत संगीता चर्चमध्ये जात होत्या. तेव्हा आरोपी राहुल जाधव हा चोरीच्या उद्देशाने परिसरात फिरत असे. त्याने संगीताला एकदा रस्त्यात अडवून तू मला आवडतेस. माझ्यासोबत येतेस का? अशी विचारणा केली होती. तेव्हा तिने शिव्या देऊन त्यास पळवले. या प्रकाराकडे तिने दुर्लक्ष केले. मात्र, पाळत ठेवून असलेल्या राहुलने साथीदार रवी आणि प्रीतमच्या मदतीने तिच्यावर अत्याचार करून खून केला.
तडीपार असताना आरोपीचे कृत्यतिन्ही आरोपींपैकी रवी गायकवाड हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याला ७ जून २०२१ रोजी दोन वर्षांसाठी तडीपार केलेले आहे. त्याच्यावर चोरी, घरफोडी, लूटमारीसारखे तब्बल ३२ गुन्हे दाखल आहेत. हद्दपार असतानाही त्याने शहरात येऊन सामूहिक अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले.