छत्रपती संभाजीनगर - कौटुंबिक वादातून डॉक्टर पत्नीने थेट घरच पेटवून दिल्याची घटना एपीआय कॉर्नरजवळ सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉ. गोविंद सुभाषराव वैजवाडे (४०) हे एका रुग्णालयात कार्यरत आहेत. तर पत्नी डॉ. विनिता (दोघेही रा. नालंदा कॉम्प्लेक्स) या नक्षत्रवाडीच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. २०१९ मध्ये त्यांचे लग्न झाले. मात्र, विनिता सातत्याने पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घालत होत्या. रविवारी रात्री त्यांच्यात पुन्हा वाद झाला. आरडाओरड सुरू झाल्याने त्यांचे शेजारी मनोज मर्दा यांनी दोघांची समजूत घातली. परंतु, वाद सुरूच असल्याने त्यांनी विनिता यांना रुग्णालयात नेऊन सोडले.
...आणि बॅग घेऊन त्या निघून गेल्या- सकाळी ६ वाजता विनिता घरी गेल्या. जोरजोरात दरवाजा वाजवणे सुरू केले. वाद वाढू नये म्हणून डॉ. गोविंद दरवाजा उघडून खाली गेले. त्यानंतर विनिता यांनी घर पेटवून दिले आणि बॅग घेऊन निघून गेल्या. - अग्निशमन दलाने तीन बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेत सोफासेट, दोन फ्रीज, ए.सी., टी.व्ही. कुलर, कपाट, शोकेस, दरवाजे, खिडक्या, डॉ. गोविंद यांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे, कपडे सर्व जळून खाक झाले.