छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात अभ्यागत समितीच्या सदस्यांनी बुधवारी ओपीडीत पाहणी केली. या पाहणीप्रसंगी एक डाॅक्टर आसनावर उभे राहून शिष्टाचाराप्रमाणे वागले नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. या तक्रारीनंतर विभागप्रमुखांनी संबंधित डाॅक्टरला तत्काळ नोटीस बजावली.
अभ्यागत समितीचे सदस्य ॲड. इक्बालसिंग सिल, नारायण कानकाटे, प्रवीण शिंदे , मोहसिन अहमद यांनी बुधवारी ओपीडीतील सोयी-सुविधांची पाहणी केली. यावेळी जागोजागी अस्वच्छता, स्वच्छतागृहांची दुरवस्था पाहून समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यापूर्वी पाहणी केली होती, तीच परिस्थिती कायम असून, कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे सदस्यांनी घाटी प्रशासनाकडे नमूद केले.
दरम्यान, एका डाॅक्टरांनी शिष्टाचाराप्रमाणे वागणूक दिली नाही, म्हणून याबाबत संबंधित विभागप्रमुखांना तक्रार करण्यात आली. विभागप्रमुखांनी त्या डाॅक्टरांना खुलासा करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. अभ्यागत समितीचे सदस्य आले, त्यावेळी रुग्ण होते. त्यामुळे हा प्रकार झाला. रुग्णसेवा ही अधिक महत्त्वाची असल्याचे संबंधित विभागातील डाॅक्टरांनी म्हटले.