औरंगाबाद : जायकवाडी धरणाचे दरवाजे १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता अर्ध्या फुटाने बंद करण्यात आले. धरणातून गोदावरी पात्रात सोडण्यात येणारा विसर्गदेखील कमी करण्यात आला आहे. नाशिककडील धरणातून येणारी आवक घटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
आगामी काळात धरणक्षेत्रात होणारा पाऊस आणि पाण्याची आवक याआधारे धरणाचे दरवाजे कमी-अधिक प्रमाणात उघडले जाऊ शकतात. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या ४३ गावांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आल्या आहेत. धरणात सध्या ९० टक्के पाणीसाठा आहे. ८ हजार क्युसेक पाण्याची आवक धरणात सध्या सुरू आहे. धरणाचे दरवाजे क्रमांक १०, २७, १८, १९, १६, २१, १४, २३, १२ व २५ असे १० दरवाजे ०.५ फुटाने बंद करण्यात आले आहेत. ५ हजार २४० क्युसेक पाणी धरणातून नदीपात्रात कमी करण्यात आले आहे.
९ हजार ४३२ क्युसेक पाणी ३१ जुलैपर्यंत सोडणे सुरू होते. सध्या ४ हजार १९२ क्युसेक दरवाजांतून व १५८९ क्युसेक पाणी जलविद्युत केंद्रातून असे एकूण ५ हजार ७८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सात दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे उघडण्यात आले हाेते. सुरुवातील २६ हजार क्युसेक पाणी धरणातून विसर्ग करण्यात आले. ३२ हजार क्युसेक पाण्याची आवक धरणात सुरू होती.