- श्रीकांत पोफळे
करमाड : पोलवरील रोहित्र अंगावर पडल्याने गाढेजळगाव ( ता. छत्रपती संभाजीनगर ) येथील पणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. शेख हयाज शेख नसरुद्दीन (४९) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ही घटना आज सकाळी 7 च्या सुमारास घडली. केवळ वायरच्या साह्याने लटकवलेले रोहित्र दोन दिवसांपासून आलेल्या वादळामुळे खाली पडले. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप सरपंच आणि ग्रामस्थांनी केला.
काही दिवसांपूर्वी या डीपीवरील रोहित्र वारंटी काळात खराब झाल्याने ते बदलून येईपर्यंत महावितरणामार्फत दुसरे तात्पुरत्या स्वरूपाचे रोहित्र बसविण्यात आले होते. मात्र, हे बसवीत असताना त्याचे नटबोल्ट टाईट करण्यात आले नसावे. त्याला फक्त रोपवायरच्या सहाय्याने लटकून दिले होते. दरम्यान, मागील दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वायर तुटून हे रोहित्र अचानक खाली पडले. दुर्दैवाने त्याचवेळी तेथे असणाऱ्या ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी शेख हयाज शेख नसरुद्दीन यांच्यावर रोहित्र पडले. अवजड रोहित्राखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, पाणीपुरवठा कर्मचारी हा कुठलीही कल्पना न देता त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यासाठी गेला. यावेळी त्याला विद्युत प्रवाहाचा धक्का लागला, यातच त्याचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती महावितरणमार्फत देण्यात येत आहे. मात्र, हा मृत्यू महावितरणच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप सरपंच आणि ग्रामस्थांनी केला आहे. मयत फयाज हे भूमिहीन असून मंडप बांधायचे काम व ग्रामपंचायतमध्ये पाणीपुरवठ्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पाश्चात आई, तीन लहान बहिणी व एक लहान भाऊ आहे. या घरातील कमविता व्यक्ती गेल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. याबाबत पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.