छत्रपती संभाजीनगर : सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाची घसरण झाल्याचे युवा महोत्सवातील कामगिरीवरून स्पष्ट झाले. काही वर्षांपासून या विभागातील प्राध्यापकांमध्ये सुरू असलेली धुसफूस, विद्यार्थिनीवर प्राध्यापकानेच अत्याचार केल्याच्या आरोपामुळे प्रतिमा धुळीस मिळाली. त्यामुळे या विभागाची वेगाने घसरण होत आहे. युवा महोत्सवात विभागाच्या विद्यार्थ्यांना फक्त दोन पारितोषिके मिळाली. त्याचवेळी तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या धारशिव उपकेंद्रातील नाट्यशास्त्र विभागाने चार पारितोषिके पटकावली आहेत.
विद्यापीठाच्या केंद्रीय युवा महोत्सवात ३६ कला प्रकारांत १२२ पारितोषिकांचे वाटप केले. त्यात सर्वाधिक पारितोषिकांसह देवगिरी महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकावले. विद्यापीठाच्या संघाला १३ पारितोषिके प्राप्त झाली. त्यात नाट्य विभागाला उत्कृष्ट अभिनय स्त्री व मूक अभिनयात प्रथम पारितोषिक मिळाले. ११ पारितोषिके इतर विभागातील विद्यार्थ्यांनी पटकावली. फाइन आर्ट विभागाने पाच प्रथम, एक द्वितीय अशी सहा पारितोषिके पटकावली. युवा महोत्सवात नाट्यशास्त्र विभागाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. हाच विभाग पूर्ण संघाचे नेतृत्व करतो. मात्र, काही वर्षांपासून विभागात अनुभवी प्राध्यापकांची कमतरता आहे. जे आहेत, त्यांच्यातील टोकाचे मतभेद आणि एकावर तर थेट विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा गुन्हा नोंद आहे. त्यातूनच ही घसरण सुरू आहे. त्या तुलनेत मागील तीन वर्षांपूर्वी धाराशिव उपकेंद्रात सुरू झालेल्या नाट्यशास्त्र विभागाने चांगलीच झेप घेतली. नाट्याशी संबंधित त्यांनी चार पारितोषिके पटकावली. त्यामुळे १९७३ साली स्थापन झालेला नाट्यशास्त्र विभाग सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असतानाच गटांगळ्या खात असल्याचे दिसले. या विभागाला देवगिरी, स.भु., केएसके महाविद्यालयांच्या नाट्य विभागांनी पाठीमागे टाकले आहे. त्यामुळे येणारा काळ विभागासाठी अधिक कठीण असल्याचेच कामगिरीवरून दिसते.
ऐतिहासिक पार्श्वभूमीचे कलाकारविद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाने ५० वर्षांत नाट्यक्षेत्राला एकाहून एक असे सरस कलाकार दिले. या विभागाचे डॉ. कमलाकर सोनटक्के, डॉ. सुधीर रसाळ, ‘वऱ्हाड निघालंय लंडन’चे डॉ. लक्ष्मण देशपांडे, डॉ. रुस्तुम अचलखांब, डॉ. शशिकांत बऱ्हाणपूरकर, डॉ. जयंत शेवतेकर अशा दिग्गजांनी नेतृत्व केले आहे.