वाळूज महानगर : धुळे-सोलापूर महामार्गावर भरधाव जाणाऱ्या एका कारने ( क्र. एम एच ४६ झेड ४८८९ ) करोडी टोलनाक्यालगत अचानक पेट घेतल्याची घटना आज दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडली. कार काही वेळातच जळून खाक झाली. सुदैवाने कारमधील चालक आणि अन्य एक प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला.
आज दुपारी धुळे-सोलापूर महामार्गावरुन एक कार भरधाव वेगात छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. करोडी टोलनाक्याच्या पुढे उड्डाणपुलाजवळ कारच्या पुढील भागातून अचानक धुर निघू लागला. धूर दिसताच गाडी बाजूला थांबवत चालक आणि अन्य एक प्रवासी खाली उतरले. त्यानंतर धूर वाढत जात कारने पेट घेतला. चालक, प्रवासी आणि इतर नागरिकांनी प्रयत्न करूनही आग आटोक्यात येत नव्हती.
दरम्यान, एमआयडीसी अग्नीशमन विभागाला फोनद्वारे आगीची माहिती देण्यात आली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. परंतू तोपर्यंत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सदरील घटनेची नोंद अग्निशमन विभागाकडे करण्यात आल्याची माहिती अग्निशमन अधिकारी सारंग वासनिक यांनी दिली.