औरंगाबाद : सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळाच्या ३ कि.मी. परिसरात आकाशात ड्रोन उडविण्यास बंदी आहे. अनवधानाने ड्रोन उडविले तर प्रारंभी ड्रोन उतरविण्यासंदर्भात इशारा दिला जातो. मात्र तरीही ड्रोन विमानतळाच्या परिसरात उडत राहिले तर ड्रोनला गोळी मारून पाडले जाऊ शकते. सुदैवाने चिकलठाणा विमानतळाच्या परिसरात अशा प्रकारे ड्रोन पाडण्याची वेळ अद्याप तरी आली नाही, असे विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले.
सुरक्षेच्या दृष्टीने आणि नियमानुसार विमानतळाच्या ३ कि.मी. च्या परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी आहे. असे असतानाही एखादे ड्रोन या परिसरात आल्यास त्याला ‘सीआयएसएफ’कडून प्रथम सुरक्षितपणे खाली उतरण्याचा इशारा दिला जातो. त्यासाठी लाल झेंडा दाखविणे, सायरन वाजविणे आदींचा वापर केला जातो. तरीही जर विमानतळ परिसरात घिरट्या घालत असेल किंवा विमान उतरण्याचा, उड्डाणाच्या परिसरात जात असेल तर त्या ड्रोनला गोळी मारून पाडण्याचे आदेश आहेत. नियमाचे उल्लंघन करून ड्रोन उडविणाऱ्यांवर गुन्हाही दाखल केला जातो. त्यामुळे विमानतळाच्या हद्दीत ड्रोन न उडविलेलेच बरे, असे म्हणण्याची वेळ ड्रोनद्वारे छायाचित्र काढणाऱ्यांवर येत आहे.
आतापर्यंत दोघांवर कारवाईविमानतळाच्या परिसरात एका लग्नसमारंभात ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात येत होते. त्याबरोबर आणखी एका व्यक्तीनेही परिसरात ड्रोन उडविले होते. हे दोन्ही प्रकार ‘सीआयएसएफ’ जवानाच्या निदर्शनास येताच संबधितांवर कारवाई करण्यात आल्याचे विमानतळाच्या सूत्रांनी सांगितले.