औरंगाबाद :शिक्षण आयुक्त सूरज मांढरे हे सध्या विविध जिल्ह्यांत जाऊन शिक्षण विभागाची झाडाझडती घेत आहेत. ते औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर २ आणि ३ फेब्रुवारी असे दोन दिवस येणार आहेत. शालेय शिक्षण सेवा हमी कायद्यांतर्गत कामांचा आढावा घेणार असले, तरी ते ऐनवेळी कोणत्याही मुद्द्याला हात घालू शकतात या भीतीपोटी अधिकारी- कर्मचारी झाडून कामाला लागले आहेत.
सोलापूर येथे शिक्षण आयुक्त मांढरे यांनी शिक्षण विभागात फेरफटका मारताना अचानक फायलींची झाडाझडती घेतली, तेव्हा अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. या पार्श्वभूमीवर आपण सतर्क असावे, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यानुसार शिक्षण विभागातील कर्मचारी फायली अपडेट करण्यात व्यस्त झाले आहेत.
शिक्षक, संस्था, नागरिकांकडून प्राप्त तक्रारींचा किती दिवसांत निपटारा केला, शैक्षणिक गुणवत्तेसाठी कोणते उपक्रम राबविले जातात, आवक जावक नोंद वही संबंधीही आयुक्तांकडून विचारणा होऊ शकते म्हणून शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी सर्वांना सतर्क केले आहे.
शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही शिक्षण सेवा हमी कायद्याची तयारी केली आहे. तपासण्या सुरू आहेत. वेळच्यावेळी फायलींचा निपटारा करण्यास कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. माध्यमिक शिक्षकांचे समायोजन, पदवीधर शिक्षकांचे पदावनत, पदोन्नतीची प्रक्रिया तसेच मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक व विस्तार अधिकारी (कनिष्ठ स्तर) यांची पदोन्नतीची प्रक्रियादेखील हाती घेतली आहे.- जयश्री चव्हाण, प्रा. शिक्षणाधिकारी
शालेय शिक्षण सेवा हमी कादा काय म्हणतोखासगी प्राथमिक शिक्षक, खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक यांच्या पगाराच्या कालावधीची माहिती, भविष्य निर्वाह निधी अग्रीम, त्याचा परतावा आणि अंतिम देयक सादर करण्याचा कालावधी. वेतन, अग्रमी, वैद्यकी बिल कधी वरिष्ठ कार्यालयास सादर केल्याची माहिती, यासह सेवा निवृत्ती प्रकरणे सादर करणे, थकीत वेतन देयक सादर करणे, शालार्थ प्रणालीची माहिती अद्ययावत करणे, सेवा निवृत्तीचे लाभ देणे, मूळ सेवा पुस्तक पडताळणी, आदी कामांचा अंतर्भाव या कायद्यात आहे.