छत्रपती संभाजीनगर : गॅरेज व्यवसाय करता करता लहान भावाला दुचाकी चोरीचे धडे देत शहरात दुचाकी, मोबाईल लूटणारे दोन सख्खे भाऊ पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. अरबाज खान आजम खान (२७) व सलमान खान आजम खान (३१) अशी चोरांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून लूटलेले १७ मोबाईल व ४ दुचाकी जप्त करण्यात आल्या.
एका महिन्यापूर्वी घाटी परिसरातून एका रुग्णाची दुचाकी चोरीला गेली होती. त्याप्रकरणी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे तपास करत असताना एका फुटेजमध्ये चोर स्पष्टपणे कैद झाले. गुप्तबातमीदारामार्फत त्यांनी त्यांचा शोध सुरू केला. अरबाज शनिवारी सकाळी वाळूजमधील कामगारांना चोरीचे मोबाईल विकण्यासाठी येत असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली. निरीक्षक संदीप गुरमे यांच्या सूचनेवरून त्यांनी तत्काळ सापळा लावत अरबाजला पकडले.
अरबाजला पकडताच त्याच्याकडील पिशवीत विकण्यासाठी आणलेले १७ मोबाईल आढळून आले. त्यानंतर त्याचा भाऊ सलमानला अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून आणखी चोरीच्या ४ दुचाकी निष्पन्न झाले. त्यांनी त्या वाळूजच्या मैदानावर लपवल्या होत्या. सलमानचे टीव्ही सेंटर परिसरात स्वत:चे गॅरेज आहे. मात्र, पैशांच्या हव्यासापोटी त्याने भावासोबत गुन्हेगारी सुरू केली. त्यांच्यावर यापूर्वी एमआयडीसी वाळूज, बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अंमलदार सतीश जाधव, संदीप तायडे, प्रकाश चव्हाण, राहुल खरात, संदीप राशीनकर, नितीन देशमुख, तातेराव शिनगारे यांनी कारवाई पार पाडली.