औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर पक्षांसोबत युती आघाडी करण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष व त्या जिल्ह्याचे प्रभारी यांनी स्थानिक पातळीवर संबंधित पक्षाशी चर्चा करून युती-आघाडी करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य कार्यकारिणीसमोर ठेवावा, असा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीत घेण्यात आला
महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या सत्ता हस्तगत करण्याच्या भानगडीत महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात आहेत. याकडे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी लक्ष द्यायला तयार नाही. वाढती महागाई, रोजगाराचा बोजवारा, शिक्षणाचा खेळखंडोबा झालेला आहे. नको त्या प्रश्नांवर तरुणांची माथी भडकवली जात आहेत, याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.
कुठल्याही क्षणी महाराष्ट्रात निवडणुका लागू शकतात, हे लक्षात घेऊन प्रस्थापित धर्मवादी आणि जातीयवादी पक्षांनी जी वंचितांची राजकीय लढाई संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला तोडीस तोड उत्तर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर, अशोक सोनोने, किसन चव्हाण, धैर्यवर्धन पुंडकर, फारूक अहमद, अरुंधती शिरसाट, अनिल जाधव, सर्वजित बनसोडे, प्रियदर्शी तेलंग, सिध्दार्थ मोकळे, नागोराव पांचाळ, गोविंद दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.