छत्रपती संभाजीनगर: मराठा, दलित अन् मुस्लिम यांचे समीकरण जुळले आहे. आता सत्ता परिवर्तन होणार, अशी घोषणा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीनंतर केली. बैठकीस मुस्लिम, दलित समाजातील धर्मगुरू आणि नेत्यांची उपस्थिती होती. जरांगे यांच्या या निर्णयाने राज्याच्या राजरकरणाला कलाटणी मिळणार का ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
आमची सहन करण्याची क्षमता संपली आता परिवर्तन होणार ,गोरगरिबांच्या लेकराला न्याय देणारी ही लाट आहे, असे म्हणत जरांगे पुढे म्हणाले, मतदारसंघात इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. आता ३ तारखेला कोणत्या जागी कोणता उमेदवार हे ठरले जाईल. एक उमेदवार निवडला जाईल. इतरांनी अर्ज मागे घेत स्टार प्रचारक म्हणून काम करायचे असा निर्णय जरांगे यांनी जाहीर केला. मराठा समाजाला मी एकत्र केले आहे. आता मुस्लिम आणि दलित समाज देखील सोबत आला आहे. यामुळे समीकरण जुळले आहे. आम्ही सोबत आल्याने बदल घडेल असा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.
'मी फडणवीस साहेबांना सांगितलं होत, गोरगरिबांना हलक्यात घेऊ नका', या इशाऱ्याचा पुनरुच्चार करत जरांगे यांनी मला यांच्या दहशतीतून मराठा समाज आझाद करायचा आहे. माझी मान जरी कापली तरी मी लढणार असे निक्षून सांगितले.
राज्यात परिवर्तन होणार अन्यायाचा विरोधात आम्ही उभा आहोत. जे आम्हाला संपवायला निघाले त्यांना संपवायचं आहे. आजच्या बैठकीत सगळ्या प्रश्नावर चर्चा झाली एकमेकांच्या धर्मात ढवळाढवळ करायची नाही असं ठरलं. मराठा, मुस्लिम, दलीत आज अधिकृत एकत्र आलो. आम्ही लोकशाही मार्गाने चालणार, लोकशाही प्रमाणे तुम्ही निवडणुकीत उभा राहत आहे, तसे आम्ही देखील उभा राहत आहोत. आता परिवर्तन होणार, सुफडा साफ होणार आहे. आम्ही धर्म परिवर्तन करायला नाही आलो, आम्ही सत्ता परिवर्तन करायला आलो आहे, असेही जरांगे म्हणाले.