छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीनुसार २१ कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी पदोन्नती दिली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून, पदोन्नत कर्मचाऱ्यांनी एक महिन्याच्या आत नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली पदोन्नती ही तात्पुरत्या स्वरुपाची आहे. भविष्यात पदोन्नतीने मिळालेली पदे रद्द झाल्यास संबंधितांना सेवाज्येष्ठतेनुसार कनिष्ठ सहायक म्हणून पदावनत करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना आता न्याय मिळाला असून, नवीन पदाची वेतनश्रेणी मिळणार असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले आहे.
जिल्हा परिषदेच्या वित्त विभागांतर्गत कार्यरत असलेल्या नऊ वरिष्ठ सहायक कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लेखाधिकारी पदावर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात आली असून, यात के. व्ही. पोफळे, एच. एस. नेवे, डी. जी. बोरसे, बी .व्ही. चंद्रटिके यांचा समावेश आहे. तसेच कनिष्ठ लेखाधिकारी पदावर कार्यरत आठ कर्मचाऱ्यांना सहायक लेखाधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली असून, यामध्ये एस. जी. बुरकुले, प्रियंका झडते, सुजाता बडोगे, ए. डी. वाघमारे, किरण सरोते, आदींचा समावेश आहे. लेखा विभागांतर्गत कनिष्ठ सहायक या पदावर कार्यरत असलेल्या चारजणांना वरिष्ठ सहायक लेखा या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये ई.एन. सुरडकर, के. जी. रेनगडे, जी. व्ही. काथार, सी. एल. बहिरवाड यांचा समावेश आहे.