छत्रपती संभाजीनगर : गावातील वादात पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर सोयगाव तालुक्यातील अम्मद मुराद तडवी (३२) हा १८ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाला होता. २४ नोव्हेंबर रोजी हियामत बाग परिसरात तो गंभीर जखमी अवस्थेत आढळला. कुटुंबाला २९ नोव्हेंबर रोजी ही बाब कळली. सायंकाळी त्यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी नातेवाइकांची वाट पाहून काही तास आधीच दफनविधी पार पाडले होते. ही हत्या असल्याचे ५ डिसेंबर रोजी निष्पन्न झाले व चार संशयितांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
शेती व्यावसायिक अम्मद बहुल खेडा येथे कुटुंबासह राहत होता. १६ नोव्हेंबर रोजी गावातीलच रहेमान आयुब शेख याने सोयगाव पोलिसांकडे अम्मदविरोधात भांडणाची तक्रार केली होती. त्यानंतर गावातीलच ईश्वर भोमा पवारने अम्मदला ठाण्यात नेले. तेव्हा त्याच्यासोबत अख्तर आयुब शेख, आब्बल सयाजी तडवी हेदेखील होते. चौघांनी माझ्या मुलाला तेव्हा जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अम्मदच्या वडिलांनी केला आहे. रहेमानच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अम्मदला नोटीसदेखील बजावली होती. त्यानंतर अम्मद १८ नोव्हेंबर रोजी अचानक बेपत्ता झाला. तणावातून गेला असेल, पाच वर्षांचा मुलगा, गरोदर पत्नीसाठी तो नक्की घरी येईल, असे कुटुंबाला वाटले. मात्र, अम्मद नंतर घरी परतलाच नाही.
इकडे मात्र हत्यादरम्यान, २४ नोव्हेंबर रोजी हिमायत बागसमोरील जलवाहिन्यांवर अम्मद मृतावस्थेत आढळला. त्याच्या अंगावर गंभीर जखमा होत्या. बेगमपुरा पोलिसांनी विविध माध्यमातून त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. माध्यमे, सोशल मीडियातून संदेश पाठवण्यात आले होते.
शेवटचे पाहायलाही मिळाले नाहीपोलिसांनी २४ ते २९ नोव्हेंबर या काळात अम्मदचा मृतदेह शवागृहाच्या शितपेटीत ठेवून कुटुंबाची वाट पाहिली. त्यानंतर २९ नोव्हेंबर रोजी त्याचा दफनविधी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी पोलिस पाटलांकडून कुटुंबाला अम्मदबाबत कळाले. कुटुंबाने तत्काळ सायंकाळी बेगमपुरा ठाण्यात धाव घेतली. मात्र, त्याच्या काही तास आधीच पोलिसांनी अम्मदचा दफनविधी पार पाडला होता. डॉक्टरांनी अम्मदची हत्या झाल्याचा अहवाल ४ डिसेंबर रोजी दिला. त्यानंतर रहेमान, अख्तर, ईश्वर, आब्बलवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे यांनी सांगितले.