करमाड (छत्रपती संभाजीनगर): शेती गहाणखत करून घेतले, परंतु चार-पाच महिने झाले तरीही खासगी बँक खात्यावर पैसे जमा करण्यास टाळाटाळ करत असल्याने चिंताग्रस्त शेतकऱ्याने अखेर शेतात जाऊन झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लाडसावंगी पं. स. गणातील पिंपळखुंटा येथे मंगळवारी (दि.२८) ही घटना घडली. विठ्ठल नामदेव दाभाडे ( ५२ ) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी अखेर करमाड पोलीस ठाण्यात गुरुवारी कुंभेफळ येथील इंडियन बँकेचे शाखाधिकारी ज्ञानेश्वर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे यांनी गुरुवारी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर वडेट्टीवार यांनी राज्य सरकारचा खरपूस समाचार घेत जबाबदार शाखाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
विठ्ठल नामदेव दाभाडे (वय ५२) जनावरांना चारापाणी करण्यासाठी मंगळवारी सकाळी शेतात गेले होते. वडील पहाटेपासून शेतात गेले, ८ वाजले तरी घरी आले नाहीत, मोबाईलही उचलत नसल्याने मुलाने शेतात जाऊन पाहिले असता वडिलांनी झाडाला गळफास घेतल्याचे आढळले. ग्रामस्थांनी घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. विठ्ठल नामदेव दाभाडे यांच्यावर पिंपळखुंटा येथे मंगळवारी दुपारी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
पिकविमा, दुष्काळी अनुदान नाही विठ्ठल दाभाडे यांनी मागील वर्षी उसनवारी करून मुलाचे लग्न मोठ्या थाटात केले होते. उसने पैसे परत करण्याची वेळ आली व दुष्काळ पडला. पिकावर झालेला खर्च निघाला नाही. पैशासाठी कर्जदारांनी तगादा सुरू केल्याने एका खासगी बँकेकडे चार महिन्यांपूर्वी शेती तारण ठेवून कर्ज मागणी केली. बँकेने शेती गहाण ठेवून घेतली. चार-पाच महिने झाले तरी बँकेचे शाखाधिकारी पैसे खात्यावर टाकण्यास टाळाटाळ करत राहिले. खरीप पेरणीचे दिवस जवळ आले. खिशात पैसा नाही. पीकविमा मिळाला नाही. दुष्काळी अनुदान मिळत नसल्याने नैराश्यापोटी दाभाडे यांनी आत्महत्या केल्याचे पिंपळखुंटा येथील नागरिकांनी सांगितले.
बँकेने शेती गहाणखत करून पैसे दिले नाहीकरमाड पोलिसांनी पंचनामा केला असता विठ्ठल दाभाडे यांच्या खिशात चिठ्ठी सापडली. या चिठ्ठीत म्हटले आहे की, ‘रोहित (मुलगा ) एक एकर शेती विकून लोकांचे पैसे देऊन टाक. आईला व तुझ्या बहिणीला जीव लाव. बँकेने शेती गहाणखत करून घेतली, पैसे दिले नाहीत. प्रयत्न करूनही यश आले नाही. निसर्ग साथ देत नाही. मुलगा, मुलगी मला माफ करा. बायको माफ कर, तुला शेवटपर्यंत साथ देऊ शकलो नाही. मित्रांनो मला माफ करा.’ असे या चिठ्ठीत लिहिले आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पैसे जमा होणार होतेविठ्ठल नामदेव दाभाडे हे आमच्या बँकेचे दोन वर्षांपासून पीक कर्ज खातेदार होते. ते कर्ज वेळेवर भरणा करत होते. नव्याने गायी खरेदीसाठी त्यांनी नऊ लाख चाळीस हजार रुपयांची मागणी आमच्या शाखेकडे केली होती. त्यांचा सिबिल स्कोर कमी असल्याने त्यांची फाईल वरिष्ठांकडे पाठविल्यावर नऊ लाख चाळीस हजार रुपये कर्ज मंजूर झाले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात पैसे खात्यात जमा होतील, असे त्यांना त्यांच्या भावासमक्ष सांगण्यात आले होते. त्यांनी आत्महत्या केल्याचे कळताच आम्हाला धक्का बसला.- ज्ञानेश्वर शिंदे, शाखाधिकारी, इंडियन बॅक, शेंद्रा बन