छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान झाल्यानंतर २ हजार ४० मतदान केंद्रांवरील सर्व बॅलेट युनिट (बीयू/मतदान यंत्र) बीड बायपासवरील एमआयटी कॅम्पसमधील एका इमारतीच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आले आहेत. ४ जून रोजी निकाल लागणार आहेत. तोपर्यंत २० दिवस पोलिसांचा बंदोबस्त दिवसरात्र असणार आहे.
सुरक्षा कमांडो, सीआरपीएफ दल आणि स्थानिक पोलिसांचे तीन स्तरीय सुरक्षाकडे (वर्तुळ) करण्यात आले आहे. बुधवारी स्थानिक पोलिसांनी स्ट्राँगरूमच्या सुरक्षेची पाहणी करून आढावा घेतला. ४ जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या फेऱ्या, टेबल, निकालाची आकडेवारी, किती वेळेत येणार निकाल यासाठी प्रशासन ३० मे पर्यंत नियोजन करणार आहे. २०१९ च्या निवडणुकीचा निकाल २६ फेऱ्यांमध्ये लागला होता. यावेळी देखील मतमोजणीच्या तेवढ्याच फेऱ्या होतील, असा अंदाज आहे.
बीयू कशा केल्या सील?सोमवारी मतदान झाल्यानंतर २ हजार ४० मतदान केंद्रावरील बीयू सील करून स्ट्राँगरूममध्ये दाखल करण्यात आल्या. बीयू सील करताना उमेदवार प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या सील टॅगवर घेण्यात आल्या. त्यानंतर बीयू पेटीमध्ये बंद करून कुलूप लावले. दोन्ही बाजूंनी खळीचा दोरा बॅलेट युनिटला बांधून लॉक केले. त्या लॉकवर सील चिकटवले. लाॅक गरम करून त्यावर एम नावाच्या सिम्बॉलचा लोगो सीलवर उमटविण्यात आला.