औरंगाबाद : दारू पिण्याच्या कारणावरून मुलानेच आई, बहीण आणि भावासमोर जन्मदात्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी घणाने प्रहार करून त्यांचा निर्घृण खून केला. यावेळी वडिलांना वाचविण्यासाठी धावलेल्या मोठ्या भावालाही घणाने मारहाण करून जखमी केल्याची घटना शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. चिकलठाणा पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या.
कडुबा भावराव घुगे (६५,रा. चिंचोली) असे मृताचे नाव आहे. नानासाहेब कडूबा घुगे (२५, रा. चिंचोली) असे आरोपी मुलाचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, कडूबा यांना मच्छींद्र आणि नानासाहेब ही मुले व तीन विवाहित मुली आहेत. शुक्रवारी सायंकाळी ते घरी परतले तेव्हा ते दारू पिऊन आल्याचे नानासाहेबच्या लक्षात आले. त्याने वडिलांसोबत वाद घालून शिवीगाळ केली. त्यांनीही नानाला शिव्या दिल्या. यानंतर नाना घरातून निघून गेला. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कडूबा घरासमोरील बाजेवर तर त्याची आई, बहीण आणि मोठा भाऊ अंगणात बसलेले होते. तेव्हा घरी आलेल्या नानाने वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. ड्रमवर ठेवलेला लोखंडी घण त्याने वडिलांच्या डोक्यात घातला. डोक्या, कानातून रक्तस्राव झाल्याने गंभीर जखमी होऊन ते बेशुद्ध पडले. आई, भाऊ, बहीण आणि भाचीने नानाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने भाऊ मच्छींद्रवर घणाने हल्ला केला. सर्वांना शिवीगाळ करीत तो निघून गेला. कुटुंबीयांनी कडूबा यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कडूबांची पत्नी संगीताबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यात नानाविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलिसांची घटनास्थळी धावघटनेची माहिती मिळताच चिकलठाणा ठाण्याचे निरीक्षक देवीदास गात, सहायक निरीक्षक शरदचंद्र रोडगे आणि उपनिरीक्षक ढंगारे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात पाठविले व नानाला ताब्यात घेतले. रक्ताने माखलेला घण पोलिसांनी जप्त केला.